कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात ऊसदराच्या प्रश्नामुळे साखर कारखान्यांची पेटलेली धुराडी पुन्हा थंडावली आहेत. शेतकऱ्यांबरोबरच ऊस तोडणी मजूर संकटात सापडले आहेत. सरकारने ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी आंदोलनकर्ते व साखर कारखानदारांची समन्वय बैठक घडवून मार्ग काढण्याची गरज आहे. सद्यस्थितीत ऊस तोडणी बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ३५०० रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसतोड घेऊ नका, असे आवाहन करत परिषदेच्या जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर आंदोलन अंकुश या संघटनेने ९ नोव्हेंबर रोजी शिरोळ येथे शेतकरी एल्गार परिषद आयोजित करून साखर कारखानदारांना इशारा दिला आहे. या आंदोलनाची धग चांगलीच तापली आहे. त्यामुळे या भागातील साखर कारखाने गेल्या दहा दिवसांपासून बंद झाल्याने ऊसतोड मजुरांचे हाल होत आहेत. शेतकरीही चिंतेत आहेत.
यंदा पावसाने दडी मारल्याने उसाची वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी कोरडवाहू भागातील ऊस करपून जाण्याची भीती आहे. ऊस दर आंदोलनामुळे तालुक्यातील श्री दत्त, टाकळीवाडीतील गुरुदत्त, हातकणंगले तालुक्यातील जवाहर, पंचगंगा, शरद हे साखर कारखाने बंद आहेत. ज्या कारखान्यांनी ऊस तोडणी सुरू करण्याचा प्रयत्न केला; त्यांच्या वाहनांची मोडतोड झाल्याने आंदोलनाची धास्ती सर्वांनी घेतली आहे. सद्यस्थितीत कर्नाटकातील काही कारखाने शिरोळ तालुक्यातील उसाची पळवापळवी करीत असल्याची चर्चा आहे.