पुणे : ऊस तोडणी, वाहतूक दरवाढीसंदर्भात झालेली तिसरी बैठकही निष्फळ ठरली. सर्व संघटना किमान ५५ टक्के दरवाढीवर ठाम राहिल्याने तोडणी दरवाढीचा तिढा कायम राहिला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात सोमवारी ही त्रिपक्षीय बैठक झाली. संघटनेच्यावतीने डॉ. डी. एल. कराड यांनी गुजरात, मध्य प्रदेश व तामीळनाडूतील दरांचा दाखला देत महाराष्ट्रात ऊस तोडणी दर खूप कमी असल्याचे सांगितले. दरात ८० ते १०० टक्के वाढीची मागणी केली. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
दरम्यान, साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला १८ टक्के वाढीचा प्रस्ताव कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी फेटाळला. साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ टक्के वाढीचा नवा प्रस्ताव मांडला. मात्र सर्व संघटनांनी तो प्रस्ताव अमान्य करून ५५ टक्क्यांपेक्षा कमी दरवाढ स्वीकारणार नाही, असे सांगितले. त्यानंतर साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चेनंतर पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर केले.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राष्ट्रीय फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार प्रकाश आवाडे, कार्यकारी संचालक संजय खताळ, तोडणी वाहतूक कामगार संघटनांचे डॉ. डी. एल. कराड, प्रा. डॉ. सुभाष जाधव, आमदार सुरेश धस, प्रा. आबासाहेब चौगुले, दत्ता डाके, जीवन राठोड, सुखदेव सानप, दत्तात्रय भांगे, प्रा. सुशिलाताई मोराळे आदी उपस्थित होते.