चार्‍याची टंचाई, चार्‍यासाठी वाढली ऊसाची मागणी

नाशिक : येथील कृषी क्षेत्र परिसरात हिरवा मका पुरेसा उपलब्ध होत नसल्यामुळे मोठ्या जनावरांसाठी चार्‍याची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जनावरांच्या चार्‍यासाठी आता शेतकर्‍यांनी ऊसाचा पर्याय शोधला आहे. यामुळे ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, चाटोरी, हिवरगाव, करंजगाव, म्हाळसाकोरे, सोनगाव या गावांमध्ये शेतकरी ऊसाचे पीक़ मोठ्या प्रमाणात घेतात. परिपक्व झालेला ऊस शेतकरी व्यापार्‍यांना अथवा स्वत:च्या वाहनाने रसवंती अथवा ऊस लागवडीसाठी किंवा जनावरांच्या चार्‍यासाठी विकतात. गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्वच पीकांनी जोम धरला. पण यंदा कोरोना आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे मार्च ते मे हे तीन महिने रसवंतीगृहे पूर्णपणें बंद होती. तसेच कारखान्यांचा गाळप हंगामही संपला होता. त्यामुळे ऊसाची मागणी कमी झाली. या सार्‍याचा परिणाम शेतकर्‍यांच्या आर्थिक बाजूवर झाला. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. पंचाळे, देवपूर, मिठसागरे या भागातील शेतकरी व्यापार्‍यांना बाराशे ते चौदाशे रुपये प्रतिटन भावाने ऊस विकत आहेत. हाच ऊस व्यापारी चाळीस कि.मी. अंतरावर जावून 2400 रुपये प्रतिटन भावाने विकत आहेत.

सध्या हिरवा मका शेतात उपलब्ध होत नसल्याने जनावरांच्या चार्‍यासाठी दाही दिशा करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली असताना, आता चार्‍यासाठी ऊसाला मागणी वाढली आहे. ऊसाचा एक टन चारा 5 जनावरांसाठी पुरतो. सध्या इतर कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी महागड्या भावाने ऊस खरेदी करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here