ऊस शेती सोडून निलगिरीकडे वळतोय शेतकरी

सूरत : भारतात ऊस हे सगळ्यांत चांगले नगदी पिक असल्याचे मानले जात. पण, गेल्या काही वर्षांत झालेले साखरेचे अतिरिक्त उत्पादन, उसाच्या दरावरून निर्माण झालेली परिस्थिती आणि दुष्काळी परिस्थिती या सगळ्याचा परिणाम ऊस शेतीवर होताना दिसत आहे. गुजरातमध्ये तर ऊस उत्पादक शेतकरी ऊस सोडून निलगिरीच्या शेतीकडे वळताना दिसत आहे. निलगिरीचे लाकूड हे कागद उत्पादनासाठी वापरले जाते. दक्षिण गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कागदाचे कारखाने आहेत. त्यामुळे कागदासाठी लाकूड आणि पानांपासून निलगिरीचे तेल, असा दुहेरी वापर सध्या होताना दिसत आहे. गुजरातमधील वन खात्याने २०१३ पासून हा हायटेक निलगिरी शेतीचा कार्यक्रम राबवला आहे.

या संदर्भात गुजरातच्या वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी जे एच राठोड म्हणाले, ‘आम्ही ओलपाड तालुक्यातील अतोदरा गावात हायटेक निलगिरी नर्सरी उभी केली आहे. सरकारच्या योजने अंतर्गत २०१३ पासून आंम्ही जवळपास २५ लाख निलगिरीची रोपे वाटली आहेत. आंम्ही निलगिरीची नवी जात विकसीत केली आहे आणि ती वितरीत केली आहे. निलगिरीच्या शेतीसाठी सरकारकडून प्रति रोप ८ रुपये पहिल्या वर्षी आणि दुसऱ्यावर्षी प्रति रोप ४ रुपये अनुदान दिले जाते.’ सुरत जिल्ह्याचा विचार केला तर, २०१३ पूर्वी तुरळक असणारी निलगिरी शेती आता १ हजार हेक्टरवर पसरली आहे. निलगिरी प्रति हेक्टर चांगले पैसे मिळवून देत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर याकडे आकर्षित होत असल्याचे राठोड यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना वन खात्याकडून वर्षाला मेंटनन्ससाठी १२ हजार रुपये दिले जातात. निलगिरीच्या शेतीतून शेतकऱ्याला ३० महिन्यांत प्रति हेक्टर पाच लाख रुपये मिळतात. एका लावणीतून निलगिरीची तीन वेळा तोडणी होऊ शकते आणि सर्व खर्च जाऊन शेतकरी १७ लाख रुपये कमवू शकतात. याबाबत गुजरात खेडूत समाजाचे अध्यक्ष जयेश पटेल म्हणाले, ‘जिल्ह्यातील अनेक शेतकरी ऊस शेती सोडून निलगिरीकडे वळले आहेत. त्यांना वर्षाला चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी निलगिरीचा पर्याय स्वीकारला आहे.’

या संदर्भात शेतकरी राजेश पटेल म्हणाला, ‘निलगिरीलाही उसासारखेच जास्त पाणी लागते. सहा महिन्यातून एकदा खतं द्यावं लागतं. त्याची पानेच त्याच्यासाठी कंपोस्ट खत तयार करतात. माझ्या दहा हेक्टर शेतीतील निम्मी शेती निलगिरीच्या लागवडी खाली तर, निम्मी ऊस लागवडीखाली आहे. पुढच्या काही वर्षांत आम्ही सगळी शेती निलगिरीची करणार आहोत.’

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here