पोटनिवडणूक ठरतेय ऊस उत्पादकांसाठी आशेचा किरण

होशियारपूर (पंजाब) : चीनीमंडी

पंजाबमधील फगवारा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. फगवाराचे आमदार सोम प्रकाश यांनी लोकसभा निवडणुकीत होशियारपूरमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाल्यानंतर फगवाराच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. पण, सध्या ही पोट निवडणूक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. फगवारा परिसरातील ऊस उत्पादनक शेतकरी सध्या चिंतेत आहे. त्यांना साखर कारखान्यांकडून त्यांच्या उसाची बिले मिळालेली नाहीत. थकीत बिलांमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने उसाची बिले मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. कारण, रिंगणात उतरणारे नेते कोणतीही कसर सोडणार नाहीत. त्यामुळे ते शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, असा अंदाज आहे.

या संदर्भात ऊस उत्पादक शेतकरी सतनाम सिंग म्हणाले, ‘आमच्याकडे पर्याय तरी काय आहे? दर वेळी असेच होते. निवडणुका जवळ आल्या की नेते मंडळी आमच्याकडे येतात. आमच्या तक्रारी ऐकून घेतात. त्यामुळे आता या निवडणुकीच्या निमित्ताने आंम्हाला आमच्या उसाची थकीत बिले मिळतील. केवळ निवडणूक काळातच आमचा आवाज ऐकला जातो.’ होशियारपूर आणि नवनशहर परिसरातील जवळपास ३ हजार ५०० शेतकऱ्यांची ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांकडून असलेल्या थकबाकीमुळे या ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केले होते. काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन बिले देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यावेळी ७६ कोटी रुपये थकबाकी होती. ती गेल्या महिन्यातील आकडेवारीनुसार आता ५७ कोटींवर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांकडून रोज ४५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बिलाच्या माध्यमातून वितरीत केले जातात. जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय झाला होता. पण, ही रक्कम कमी असून, अजून बरीच रक्कम शिल्लक आहे.

शेतकऱ्यांकडे उपजिविकेचे इतर कोणतेही साध नसल्यामुळे त्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. पण, वित्तीय संस्था आणि बँकांनी हात वर केल्यामुळे आता शेतकऱ्यांपुढे कुटुंबांना घेऊन धरणे आंदोलन करणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. पंजाबमध्ये भात आणि गव्हानंतर ऊस हे एक नगदी पिक आहे. पण, सरकारी अनास्थेमुळे ऊस उत्पादक शेतकरी बेजार झाला असून, त्याचा संयम सुटण्याची वेळ आली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here