साखर कामगारांचा संप; उसाला कवडीमोल भाव

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी

किसान सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील गावांमध्ये ऊस तोड बंद पडली आहे. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, कवडीमोल भावाने ऊस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ऊस लागवड करायची की नाही, असा विचार आता शेतकरी करू लागला आहे. साखर कामगारांच्या संपामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्याचा फायदा उठवत शेतकऱ्यांचा ऊस इतर जिल्ह्यांत कवडीमोल भावाला विकला जात असल्याचे दिसत आहे. शेतकरीही काहीही हातात न येण्यापेक्षा काही तरी मिळावं या उद्देशाने मिळेल, त्या दराला ऊस विकताना दिसत आहे. त्यामुळे पुढील हंगामात परिसरात ऊस लागवड होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ऊस उत्पादन केवळ कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

पटना ऊस केंद्रावर डझनावर ऊस ट्रॉली पडून आहेत. केवळ साखर कारखान्यांतील कामगारांनी संप केल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस सुकत आहे. येत्या काही दिवसांत ऊस गाळपासाठी गेला नाही तर, उसाच्या किमतीपेक्षा त्यासाठीचं भाडं द्यावं लागेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आता संप मिटल्यानंतर पुन्हा ऊस खरेदी होईल, अशी आशाही काही शेतकरी व्यक्त करत आहेत.

दखिनवारा येथील शेतकरी जय प्रकाश यांनी म्हटले आहे की, पुढच्या हंगामात आता ऊस लागवड करणार नाही. दर वर्षी असचं काही तरी घडत असतं. कष्ट आम्ही घेतो आणि त्याचे फळ दुसऱ्याच कोणाला तरी मिळते. कारखान्यांचे गाळप कधी संपेल हे कळत नाही. सरैया मझौवा येथील शेतकरी अजय भान सिंह म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे ऊस लागण करत आहे. गेल्या तीन वर्षांतील कारखान्यांची स्थिती पाहिली तर, उसामुळे अपेक्षा भंगच झाला आहे.’ धनजई येथील पंजबहादुर सिंह म्हणाले की, काही अंतरावरच असलेल्या मसौधा साखर कारखान्यांच्या बाहेर उसाची ट्रॉली सहा तासही थांबत नाही. आमच्याकडे मात्र, ऊस विकायला काही दिवस जावे लागतात. असले पीक घेऊन फायदा तो कोणाचा? कधी संप, कधी यंत्रसामग्रीची समस्या काही ना काही तरी असतेच.

साखर कामगारांचा विचार केला तर, त्यांना यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच थकीत वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती. पण, हंगाम संपत आल्यानंतरही त्यांच्या हातात काही पडलेले नाही. त्यामुळे कामगारांचा आक्रोश वाढला आणि गाळप थांबले आहे. आता काही दिवस कारखाना बंद राहिल्यानंतर तो पुन्हा सुरू होण्याला पुन्हा अवधी द्यावा लागतो. यात नुकसान शेतकऱ्यांचेच होताना दिसत आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here