अंबाला : नारायणगढ साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास होणारा उशीर, पिकावरील टॉप बोरर तसेच पोक्का बोईंगसारख्या रोगामुळे होणारे नुकसान यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारखान्याकडून गेल्या हंगामातील ऊस बिले मिळविण्यास संघर्ष करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता किडींच्या हल्ल्यामुळे संकट वाढले आहे. आम्हाला रोग नियंत्रणासाठी अतिरिक्त खर्च येत आहे. त्यातून उत्पादन खर्च वाढल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दि ट्रिब्यूनमध्ये प्रकाशितवृत्तानुसार, ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा यांनी सांगितले की, उसावरील टॉप बोरर रोग पिकासाठी हानीकारक आहे. किडींनी पिकाच्या वाढीवर गंभीर परिणाम केला आहे. फंगीसाइड आणि किटकनाशकांच्या स्प्रेवर प्रती एकर १०,००० रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ऊस बिलांना होणारा उशीर हासुद्धा नारायणगढ मधील शेतकऱ्यांसमोरील चिंतेचा विषय आहे. सरकारी अधिकाऱ्यांकडून कारखाना चालवूनही शेतकऱ्यांना बिले मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नारायणगढ एमडींना कारखान्याच्या सीईओचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. सरकारने एक कायमस्वरुपी सीईओ नियुक्त करण्याची गरज आहे.
कृषीविकास अधिकारी हरीश कुमार यांनी काही विभागात टॉप बोरर आणि पोक्का बोईंग रोग पसरल्याची माहिती मिळाली, मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. Co०२३८ प्रजातीवर मुख्य परिणाम दिसला आहे. शेतकऱ्यांना किडींच्या नियंत्रणासाठी सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.