SRA ने साखर कारखाने ऑगस्टमध्ये सुरू करण्याची ऊस उत्पादकांची मागणी

वेस्टर्न विसायसमधील हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन प्लांटर्स फेडरेशनने शुगर रेग्युलेटरी ॲथॉरिटीकडे (SRA) सप्टेंबर ऐवजी येत्या ऑगस्टमध्ये कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

याबाबत शुगर काउन्सिलने म्हटले आहे की, जवळपास हजारो हेक्टर ऊस काढणीसाठी तयार आहे. एक वर्षाआधी, जून २०२२ मध्ये सरकारने लवकर साखर कारखाने सुरू करण्यासाठी आवाहन केले. त्याला शेतकऱ्यांनीही प्रतिसाद दिल्याने या कालावधीत ४,३२,३५६ टन उसाचे गाळप झाल्याची नोंद एसआरएकडे आहे. परिणामी आता ४,००,००० टन ऊस गाळपासाठी तयार आहे. जर गाळप सप्टेंबरमध्ये सुरू झाले तर पिकाचे वजन, गुणवत्ता खालावून नुकसान होऊ शकते असे त्यांनी एसआरएच्या निदर्शनास आणून दिले.

याबाबत सनस्टारमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशातील साखरेच्या टंचाईमुळे गेल्या वर्षी, सात कारखान्यांनी ऑगस्टमध्ये गाळप सुरू केले. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस आता पक्व झाला आहे. त्यामुळे २० जुलै रोजी एसआरएचे प्रशासक पाब्लो लुईस एस. अजकोना यांना लिहिलेल्या पत्रात, शुगर काउन्सिलने ऑगस्टमध्ये कारखाने सुरू करण्याची मागणी केली आहे. या पत्रावर कॉन्फेडरेशन ऑफ शुगर प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष ऑरेलिओ गेरार्डो वाल्डेरामा ज्युनियर, नॅशनल फेडरेशन ऑफ शुगरकेन प्लांटर्सचे अध्यक्ष एन्रिक रोजास आणि पानाय फेडरेशन ऑफ शुगरकेन फार्मर्सचे अध्यक्ष डॅनिलो अबेलिता यांनी स्वाक्षरी केली आहे.

गेल्यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम लवकर संपला. अनेक कारखान्यांनी मे महिन्याऐवजी एप्रिलमध्ये गाळप बंद केले. त्यामुळे शेतकऱ्यांना एप्रिलपासून काहीही उत्पन्न मिळालेले नाही. ऊस उत्पादकांकडील नियमित कामगारही ऑगस्टमध्ये पुन्हा कामावर रुजू होण्यास उत्सुक आहेत. जर कारखाने सुरू करण्यास उशीर झाला तर कामगारांना आर्थिक मदत द्यावी लागेल असे परिषदेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here