हरिद्वार (उत्तराखंड) : देशात पुढचा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नाराज शेतकऱ्यांनी किसान क्लबच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. साखर कारखान्यातील शिल्लक साखरेचा लिलाव करून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे भागवावेत, अशी मागणी क्लबच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा २५ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्लबच्या वतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात किसान क्लबची बैठक साबतवाली गावात झाली. बैठकीला क्लबचे राष्ट्रीय अध्यक्ष कटार सिंह उपस्थित होते. ते म्हणाले, ‘साखर कारखाने आणि ऊस विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. अजूनही ऊस उत्पादकांचे एफआरपीचे पैसे देण्यात आलेले नाहीत. दोन्ही साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये १३७ कोटी रुपयांची साखर पडून आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी मनात आणले तर, साखर कारखान्यांच्या गोदामातील साखरेचा लिलाव करून, ऊस उत्पादकांचे पैसे भागवले जाऊ शकतात. ऊस विभाग आणि जिल्हा प्रशासन साखर कारखान्यांच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई करत नाही. आंम्ही औपचारिकता म्हणून, केवळ नोटिस दिली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर, २५ ऑगस्टला मोठे आंदोलन करण्यात येणार आहे.’ आंदोलनाची तयारी सुरू केल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.