ऊस तोडणी कामगारांनी पूर्ण केली विमान प्रवासाची स्वप्नपूर्ती

बेळगाव : सोनोली (ता. बेळगाव) येथील ऊसतोड टोळीतील सदस्यांनी सांबऱ्याहून थेट विमानाने तिरुपती गाठले. त्याठिकाणी देवदर्शन घेऊन ते रेल्वेने माघारी परतले. राकसकोप रस्त्यावरील सोनोली या सुमारे १५०० लोकसंख्येच्या गावातील सामान्य ऊसतोड कामगारांनी विमान प्रवासाचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे नियोजन करून त्यांनी सांबरा ते तिरुपती असा प्रवास विमान प्रवास केला. एकूण २७ जणांचा यात सहभाग घेतला.

कामगारांसह काहीजणांनी आपल्यासोबत आपल्या पत्नींनाही विमान प्रवासाचा आनंद मिळवून दिला. बेळगावच्या सांबरा विमानतळाहन सर्वजण २७ रोजी तिरुपतीकडे झेपावले. केवळ बसप्रवास माहीत असणाऱ्या शेतकरी महिलांना विमानतळ, तेथील वातावरण सारेच नवखे होते. विमान स्थिरावताच प्रत्येकाच्या तोंडावर प्रवासाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद पाहायला मिळाला. प्रत्येकाला ५,३०० रुपये प्रवास खर्च आला. ऊसतोड टोळीप्रमुख परशराम पाटील, ट्रॅक्टर मालक केशव भुजबळ, परशराम य. पाटील, जोतिबा पाटील, मोहन पाटील, मोहन बिजगर्णीकर, लक्ष्मी पाटील, सुनीता पाटील, सुधा कडोलकर, यल्लुबाई कडोलकर आदींचा यात समावेश होता. लहानपणापासूनच विमान प्रवास करावा, असे वाटत असे. ती स्वप्नपूर्ती करण्यासाठी आम्ही नियोजन करुन प्रवास केला, असे जोतिबा पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here