रुडकी : इक्बालपूर शुगर मिलने उसाचे गाळप बंद केल्यानंतर आता गुऱ्हाळघरांना जाणाऱ्या उसाचा दर ३८० रुपये प्रती क्विंटल दराने दिला जात आहे. मात्र, या दरवाढीचा फायदा काही मोजक्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. झरबेडा आणि ग्रामीण भागात डझनभर गुऱ्हाळघरे सुरू आहेत. झरबेरा विभागात उसाच्या गुऱ्हाळांची संख्या खूप आहे. सद्यस्थितीत आवक घटल्याने ऊसाचे दर झपाट्याने वाढले आहेत. विभागात ऊस ३७० ते ३८० रुपये प्रती क्विंटल दराने ठेकेदार खरेदी करीत आहेत.
लाइव्ह हिंदू्स्थान डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी सांगितले की, सध्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस शिल्लक नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात ऊस शिल्लक आहे. सध्या गुळाचे दर वाढल्याने ऊस दरात वाढ झाल्याचे गुऱ्हाळघरांचे ठेकेदार प्रदीप सत्तार, अक्रम, मेहरबान आदींनी सांगितले. गुळाचे दर वाढल्यानंतर ऊसाचा दर वाढविण्यात आला आहे. आता पुरवठा कमी असल्याने विभागातील काही बड्या शेतकऱ्यांकडेच ऊस शिल्लक आहे. त्यामुळे दरात तेजी आली आहे.