गाळप हंगाम 2023-24 : राज्यातील ‘हे’ चार आहेत विभाग साखर उत्पादनात आघाडीवर

कोल्हापूर : महाराष्ट्रात 2023-24 चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून 7 एप्रिलअखेर राज्यातील साखरेचे उत्पादन 108 लाख टनांच्या पुढे गेले आहे. यंदा उसाचे गाळप, साखर उत्पादन आणि रिकवरीमध्ये कोल्हापूर विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर (अहमदनगर) अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.

कोल्हापूर विभागात 278.6 लाख क्विंटल साखर उत्पादन…

कोल्हापूर विभागात एकूण 40 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यामध्ये 26 सहकारी आणि 14 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होता. आतापर्यंत 39 साखर कारखान्यांचा हंगाम समाप्त झाला असून विभागात केवळ 1 च कारखाना सुरु आहे. कोल्हापूर विभागात 240.72 लाख टन उसाचे गाळप झाले असून 278.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. विभागाचा सरासरी उतारा विक्रमी 11.57 इतका आहे.

साखर उत्पादन, उताऱ्यात पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर…

या क्रमवारीत पुणे विभाग दुसऱ्या स्थानावर आहे. याविभागात एकूण 31 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होता. 31 पैकी 26 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. या कारखान्यांनी 233.51 लाख टन उसाचे गाळप करून 244.72 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा 10.48 इतका आहे.

सोलापूर विभाग 9.38 टक्क्यांसह उताऱ्यात पाचव्या क्रमांकावर…

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर विभागात एकूण 50 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यात 19 सहकारी आणि 31 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. आतापर्यंत 45 कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. या विभागात 216.11 लाख टन उसाचे गाळप झाले असून 202.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर विभाग 9.38 टक्क्यांसह उताऱ्यात राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे.

अहिल्यानगर विभागात 18 कारखाने बंद झाले बंद…

चौथ्या क्रमांकावर असलेल्या अहिल्यानगर (अहमदनगर) विभागात 27 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यात 16 सहकारी आणि 11 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या सर्व कारखान्यांनी 139.11 लाख टन उसाचे गाळप करून 138.68 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 18 कारखाने बंद झाले असून नु कारखाने अद्याप सुरु आहेत. या विभागाचा सरासरी साखर उतारा 9.97 टक्के इतका आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागात 3 कारखाने अद्याप सुरु…

छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण 22 कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यात 13 सहकारी आणि 9 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. 22 मधील 19 कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. तीन कारखाने अद्याप सुरु आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून आतापर्यंत 97.81 लाख टन उसाचे गाळप करून 8.93 उताऱ्यासह 87.31 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागात 29 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात श्भ्ग घेतला होता. त्यात 10 सहकारी आणि 19 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी 25 कारखाने आता बंद झाले आहेत. या विभागात आतापर्यंत 117.54 लाख टन उसाचे गाळप होऊन 120.42 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 10.25 टक्क्यांसह हा विभाग उताऱ्यात राज्यात कोल्हापूर आणि पुणे पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गाळप, साखर उत्पादनात अमरावती, नागपूर विभाग पिछाडीवर…

अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या विभागातील गाळप हंगाम समाप्त झाला आहे. या विभागात 9.94 लाख टन उसाचे गाळप होऊन 9.34 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 9.4 टक्के आहे. नागपूर विभागात 4 खाजगी कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला होता. त्यांनी 4.44 लाख टन उसाचे गाळप करून 2.87 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा राज्यात सर्वाधिक कमी 6.46 टक्के इतका आहे.

राज्यात आतापर्यंत 108.47 लाख टन साखर उत्पादन…

07 एप्रिल 2024 पर्यंत राज्यात 1059.18 लाख टन उसाचे गाळप झाले असून 1084.73 लाख क्विंटल (108.47 लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. मागील हंगामात याच वेळी 211 साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता आणि 1053.91 लाख टन उसाचे गाळप केले होते आणि 1052.38 लाख क्विंटल (105.23 लाख टन) साखरेचे उत्पादन केले होते. महाराष्ट्रातील चालू हंगामात मागील हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत 178 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. गेल्या हंगामात 07 एप्रिलपर्यंत 211 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले होते. तसेच या हंगामात साखरेच्या वसुलीतही किंचित वाढ दिसून येत आहे. 2023-24 च्या हंगामात राज्यात 07 एप्रिल 2024 पर्यंत साखरेची रिकव्हरी 10.24 टक्के होती, तर गेल्या हंगामात या वेळेपर्यंत साखर रिकव्हरी 10.00 टक्के होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here