नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटमधील प्रायोगिक कारखान्यात ऊस गाळप सुरू

कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिस्टूटमधील प्रायोगिक साखर कारखान्यात विधीवत उसाचे गाळप सुरू करण्यात आले. आपल्या विद्यार्थ्यांना साखर क्षेत्रातील परीपूर्ण प्रशिक्षण देणारी एनएसआय ही जगातील एकमेव शुगर इन्स्टिट्यूट आहे. सुमारे ४५ दिवस या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहिल. या कालावधीत एनएसआयच्या कार्यक्षेत्रामधील शेतांतील उसाचा वापर केला जाणार आहे.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. नरेंद्र मोहन म्हणाले की, प्रायोगिक साखर कारखान्याची क्षमता आणि वैविध्य अनोखे आहे. येथे कच्ची, प्रक्रियाकृत पांढरी साखर तयार करण्याची सुविधा आहे. साखर कारखाने एकतर कच्ची किंवा प्रक्रियाकृत साखर तयार करतात. मात्र येथे विद्यार्थ्यांना यासंदर्भातील सर्व शिक्षण देण्याची सुविधा यामध्ये आहे. संस्थेच्या विद्यार्थ्यांना चांगले सैद्धांतिक आणि व्यावहारिक ज्ञान दिले जाते. त्यामुळे केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील साखर उद्योगांनीही ते सहज स्वीकारले आहे, असे ते म्हणाले.

प्रशिक्षण विभागाचे प्रभारी अधिकारी अशोक गर्ग यांनी सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांना ऊस उत्पादनापासून ते साखर उत्पादन आणि कारखान्याच्या व्यवस्थापनापर्यंत सर्वसमावेशक व्यावहारिक ज्ञान देत आहोत. आम्ही काही नवीन उसाच्या वाणांच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्या ऊसाच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करण्याच्या पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. आम्ही व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, सेंट्रीफ्यूगल आणि रोटरी ज्यूस स्क्रीन स्थापित करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्लांटचे आधुनिकीकरण केले आहे, असे गर्ग यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here