भारतातील शेतकऱ्यांकडून नेपाळमध्ये उसाची विक्री

93

गोरखपूर : महराजगंज जिल्ह्यातील निचलौल तहसीलमधील भाठ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त बनले आहेत. कमी वितरण आणि उसाची कमतरता दाखवून गडौरा साखर कारखाना बंद करण्यात आला. ६५ लाख क्विंटल क्षमतेच्या या साखर कारखान्याला १८ लाख क्विंटल ऊस देण्यात आला. त्यापैकी कारखान्याला ८ लाख क्विंटलच ऊस मिळाला. परिणामी कारखाना २२ जानेवारीपासून बंद झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साखर कारखान्याने ऊस न नेल्याने येथील शेतकऱ्यांनी आता आपला मोर्चा नेपाळकडे वळवला आहे. तेथे मिळेल त्या किमतीवर ऊस विकण्यासाठी शेतकरी तयार झाले आहेत.
दोन वर्ष बंद राहून सुरू झालेल्या गडौरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवडही सुरू केली. मात्र साखर कारखाना आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील बेबनावामुळे या हंगामातील उसाच्या गाळपाचे पैसेही शेतकऱ्यांना मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील उस दुसरीकडे आणि क्रशर्सना देण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे ऊस उपलब्ध नसल्याचे सांगत वेळेपूर्वीच साखर कारखाना बंद करण्यात आला आहे.

गडौरा साखर कारखान्याला आपल्या क्षेत्रातील उसाचे गाळप करता आलेले नाही. कारखान्याने गाळपाला अतिशय संथ सुरुवात केली. सुरुवातीला शेतकऱ्यांना एसएमएस तोडणी पावतीसाठी प्रतीक्षा करावी लागली. आता पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत. चालू गळीत हंगामात १८ लाख क्विंटल ऐवजी कारखान्याला फक्त ८ लाख क्विंटल ऊस मिळाला आहे. दरम्यान, पैसे मिळू शकणार नाहीत या भीतीने शेतकऱ्यांनी कारखान्याकडे आपला ऊस पाठवला नाही. अनेक दिवस तोडणी पावतीनुसार उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न केला. आता कारखान्याकडील थकीत १० कोटी १० लाख रुपयांच्या पूर्ततेनंतरच नव्या हंगाातील बिले मिळतील असे महराजगंजचे जिल्हा ऊस अधिकारी जगदीश यादव यांनी सांगितले.

साखर कारखान्याकडे १० कोटींची थकबाकी
साखर कारखान्याकडून आधीची देणी दिली गेलेली नाहीत. नव्याने गाळप झालेल्या उसाचे पैसेही मिळालेले नाहीत. साखर कारखान्याकडे २०१४-१५ आणि २०१७-१८ या हंगामातील उसाची दहा कोटी दहा लाखांची थकबाकी आहे. तर चालू गळीत हंगाम, २०२०-२१ या वर्षातील अंदाजे २५ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्याकडे आहेत.

शेतकऱ्यांना उसाची थकबाकी देण्यासाठी उत्पादीत साखरेपैकी ८५ टक्के साखरेची विक्री केली जाईल. कारखाना आणि जिल्हा ऊस अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. प्रशासन आधी पूर्वीची थकबाकी देत आहे. नंतर नव्या हंगामातील पैसे दिले जातील.
– दीनदयाल पांडे, सर व्यवस्थापक, गडौरा साखर कारखाना

पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत
निचलौल परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गडौरा साखर कारखान्यामुळे त्रस्त आहेत. भाठ परिसरातील शेतकरी पी. एन. पांडे, इजहार अली, सिंहासन कुशवाहा आणि सुरेश यांनी सांगितले की, सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दरवेळी ऊसाचे पैसे मिळवण्यात अडचणी येतात. साखर कारखान्याचे गाळप पूर्णपणे बंद आहे. परिसरातील शेतकरी ऊस पिकवतात. मात्र, त्याचा फायदा कारखाना प्रशासन आणि सरकारलाच मिळतो. कारखान्याला यापूर्वी जो ऊस पाठवला होता, त्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत असे शेतकऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here