ऊस वाहतुकीच्या वाहनांवर बसणार रिफ्लेक्टर

बिजनौर : दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटल्याने होणाऱ्या दुर्घटनांच्या शक्यतेमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर, फ्लोरोसेंट पट्ट्या बसवण्यात येणार आहेत. जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी ऊस आयुक्तांच्या निर्देशानुसार समित्यांचे सचिव आणि साखर कारखान्यांना पत्रे पाठवून याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व नऊ साखर कारखान्यांकडून ऊस खरेदी सुरू आहे. सध्याच्या थंडीच्या वातावरणात पहाटे व सकाळी दाट धुके पसरते. त्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्यावतीने अभियान राबवून ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रिपर, बैलगाडी अशा सर्व वाहनांवर रिफ्लेक्टर आणि फ्लोरोसेंट पट्ट्या लावण्यात येणार आहेत. हंगामात दोन ते तीन वेळा अभियान राबवले जाईल. साखर कारखाने स्वतः हे अभियान राबवतील. ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ट्रकच्या पुढे आणि पाठीमागील बाजूसही सहा इंचाच्या लाल, पिवळ्या फ्लोरोसेंट पट्ट्या लावल्या जातील. ऊस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व साखर कारखाने, सचिवांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सचिवांकडून या अभियानावर लक्ष ठेवले जाईल, असे जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here