अहमदनगरमध्ये प्रति टन ३५०० रुपये दर देणाऱ्या कारखान्यालाच ऊस पाठविणार : शेतकरी संघटना

अहमदनगर : गेल्या तीन ते चार वर्षांपासून तेलंगणा राज्यात उसाचा दर ३३०० ते ३७०० रुपये प्रति टन दिला जात आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ३५०० रुपये प्रति टनाच्या पुढे दर द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्ह्यात जो कारखाना प्रति टन ३५०० रुपयापेक्षा जास्त दर देईल, त्या कारखान्यास शेतकरी ऊस देईल. कमी दर देणाऱ्या कारखान्यास शेतकरी ऊस देणार नाहीत, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी म्हटले आहे.

‘अहमदनगर लाईव्ह २४’ या वेबसाइटवर प्रकाशित वृत्तानुसार, औताडे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सुमारे बारा वर्षांपूर्वी साखरेचे दर प्रति क्विंटल २२०० रुपये होते. त्यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कारखान्याने २८०० रुपये प्रति टन दर दिला. अहमदनगर जिल्ह्यातील उर्वरीत कारखान्यांनी २००० रुपये प्रति टन दर दिलेला आहे. आता साखर ३००० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल आहे. जागतिक बाजारातही साखरेचे दर ६५ ते ६६ रुपये किलो आहेत. त्यामुळे ऊस दर वाढविण्याची गरज आहे.

ते म्हणाले की, कोल्हापूर व सांगली जिल्हे साडेतीन हजार रुपये दर देण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना बेळगाव जिल्ह्याच्या ऊस दराची स्पर्धा करावी लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यात उसाला ३५०० ते ३७०० रुपये दर दिला जात आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यात पाऊस कमी झाला आहे. उसाचे उत्पादन घटले आहे. जिल्ह्यात ऊस फक्त १०० मेट्रिक टन मिळेल. जिल्ह्यातील २३ कारखान्यांची गाळप क्षमता २०० ते २५० मे. टन आहे. त्यामुळे जो कारखाना जास्तीचा दर देईल. त्या कारखान्यास शेतकरी आपला ऊस देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here