नवी दिल्ली : अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारत टोळ किटकांच्या आक्रमणापासून मुक्त झाला आहे. काही वर्षांपूर्वी खरीप हंगामात टोळधाडीचे संकट समोर आले होते.
केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत टोळधाडीचा अभ्यास करणाऱ्या जोधपूरमधील संघटनेद्वारे करण्यात आलेल्या नियमीत सर्वेक्षणानुसार, देशात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वाळवंटातील टोळ किटकांच्या आक्रमणापासून मुक्ती मिळाल्याचे दिसून आले आहे. १३ जून रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील सुरधना येथे एक टोळ दिसून आला होता.
नव्या सर्वेक्षणानुसार, स्थानिक स्तरावर राजस्थान आणि गुजरामधील १६० ठिकाणांची पडताळणी करण्यात आली. भारत ग्रेगोरियस टोळीच्या हालचालींपासून मुक्त आहे असे जोधपूरच्या लोकस्ट वॉर्निंग ऑर्गनायझेशनने सांगितले.
टोळ किटकांचे आक्रमण अन्न सुरक्षेला धोका पोहोचवू शकते. याबाबतची सद्यस्थिती मांडताना सांगण्यात आले की, काही ठिकाणी ओलावा टिकून असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे. जूनच्या पहिल्या दहा दिवसातील पावसाच्या स्थितीनुसार, जालोर, जोधपूर, फलोदी, बिकानेर आणि सूरतगढ विभागात मध्यम पाऊस कोसळला होता. तर भूजशिवाय इतर विभागात कमी ते मध्यम पाऊस पडला.
२०२० च्या सुरुवातीला पाकिस्तानमधून टोळ किडींचे संकट गतीने पसरले होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय आणिबाणीची स्थिती असल्याचे जाहीर करावे लागले होते. त्या कालावधीत भारतामध्ये राजस्थान, गुजरात, पंजाबचा काही भाग, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात स्थानिक मोठ्या टोळधाडीचा हल्ला पिकांवर झाला होता.
पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या राजस्थानच्या जिल्ह्यांमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतात टोळांचे थवे पहिल्यांदा दिसले. त्यानंतर टोळांनी पीक क्षेत्राच्या मोठ्या भागाचे नुकसान केले, परंतु ते प्रामुख्याने राजस्थानपर्यंत मर्यादित होते.
भारतामध्ये शेतकऱ्यांनी १२९.३ लाख हेक्टरमध्ये खरीप पिकांची पेरणी केली आहे. गेल्या वर्षी समान कालावधीत १३५.६४ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. भात, मुग, बाजरी, मक्का, भुईमुग, सोयाबीन आणि कापून ही प्रमुख पिके आहेत. भारतात तीनपैकी खरीप आणि रब्बी या दोन हंगामावर अधिक भर दिला जातो. याशिवाय उन्हाळी पिकेही घेतली जातात.
खरीप हंगामात जून-जुलैमध्ये पेरलेल्या पिकांची काढणी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते. रब्बी हंगामात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पेरलेल्या आणि जानेवारी-मार्चमध्ये कापणी केलेल्या पिकांचा समावेश आहे. रब्बी आणि खरीप यांदरम्यान उन्हाळी पिके घेतली जातात.