कोल्हापूर : जिल्ह्यात अनेक ऊस वाहतूकदारांना तोडणी मुकादमांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे अनेक ऊस वाहतूकदार देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीसप्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, ऊस तोडणी मुकादमांविरोधात सुमारे १६०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच आतापर्यंत साडेसातशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तरी फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर तत्काळ कारवाई व्हावी, तसेच गुन्हा नोंद करण्यापूर्वी मुकादमास खात्याकडून पूर्वसूचना अथवा नोटिसीद्वारे गुन्हा नोंदणीची कल्पना देऊन वाहतुकदार व मुकादम यांच्या समन्वयातून प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत व्हावी, झिरो नंबरने गुन्हे नोंद करण्यात येऊ नयेत, नोटरी कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्यात केलेली असूदे, ऊस वाहतूकदार ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राहतो त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदवून घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, विठ्ठल पाटील, प्रवीण शेट्टी, विनोद पाटील, शिवाजी पाटील, संदीप मगदूम, अशोक कुन्नुरे, दत्ता बाबर, वसंतराव प्रभावळे, पिराजी पाटील, भिकाजी पाटील, रामराव देसाई आदी उपस्थित होते.