उसाला प्रतीटन ४०० रुपये दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेळगावमध्ये धडक

बेळगाव : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर असल्याने कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा ,या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

कर्नाटकातील साखर कारखान्यांनी उसाचे वजनकाटे ऑनलाईन करावेत, महाराष्ट्र सरकारप्रमाणे वाहतूदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व कारखान्यांकडून एफआरपी अधिक जादाची रक्कम देवून गळीत हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. शेतकरी, वाहतूकदारांच्या प्रश्नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

गेल्यावर्षी इथेनॅाल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी प्रती टन १५० रुपये व इतर कारखान्यांनी प्रती टन १०० रुपये एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. कर्नाटकमध्ये साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असून काटामारीचे प्रमाण जास्त आहे. सरकारने वजनकाटे ॲानलाईन करावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, संदीप राजोबा, सुरेश चौगुले, तात्या बसण्णावर, गणेश इळेगेर, बाबूराव पाटील यांच्यासह चिकोडी, रायबाग, बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here