कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र करत परिसरातील दालमिया साखर कारखान्याच्या ऊस तोडण्या बंद केल्या. वाकरे (ता. करवीर) येथे दालमिया कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून वाकरे गट ऑफिसला कुलूप घातले. यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना ऊस तोडणी बंद करण्याबाबत बजावले. जोपर्यंत मागील हंगामातील चारशे रुपये आम्हाला मिळत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कुणालाही तोडण्या देऊ नका. जर काही शेतकऱ्यांचा उद्रेक घडल्यास दालमिया कारखान्याचे मॅनेजमेंट जबाबदार राहील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गट अधिकाऱ्यांना देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुंभी परिसर अध्यक्ष बाजीराव देवाळकर (कोपार्डे), दोनवडे येथील पांडुरंग शिंदे, बाजीराव पाटील, खोतवाडी येथील दगडू गुरुवळ, कोपार्डे येथील रंगराव पाटील, सांगरुळ येथील सुनील कापडे, पोपट मडगे, विकास देसाई, दोनवडे येथील शहाजी शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.