‘स्वाभिमानी’चे बांबवडे, चिखली, आरळा साखर कारखान्यांवर खर्डा -भाकरी आंदोलन

कोल्हापूर : शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांबवडे, चिखली, आरळा कारखान्यांवर शुक्रवारी अधिकाऱ्यांना खर्डा -भाकरी देत आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ७ नोहेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जयसिंगपुरात ऊस परिषद घेतली. गेल्या हंगामातील ४०० रुपयांचा फरक व यंदाच्या हंगामात ३५०० रुपये पहिली उचल देण्याचा आपली मागणी कायम आहे. या मागणीला प्रतिसाद देत ऊस दराची कोंडी कारखानदारांनी फोडावी असे कार्यकर्त्यांनी सांगितले.दरम्यान, ऊस दराबाबत लवकरच तोडगा निघेल, असे आश्वासन वारणा साखर कारखान्याचे प्रमुख, आमदार विनय कोरे यांनी दिले.

‘स्वाभिमानी’च्यावतीने कारखान्यांच्या चेअरमनना धनत्रयोदशी, दिवाळीच्या दिवशी, पाडवा, भाऊबीज असे चार दिवशी खर्डा -भाकरी देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोनवडे – बांबवडे येथील अथणी शुगरचे चीफ इंजिनिअर मारुती पाटील, चिखली विश्वास साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, दालमिया शुगर करुंगळी – आरळा यांना शाहूवाडी, शिराळा तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी दिली. यावेळी शाहूवाडी तालुकाध्यक्ष सुरेश म्हाऊटकर, शिराळा तालुकाध्यक्ष मानसिंग पाटील, वसंत पाटील, राम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, वारणानगर येथे आ. डॉ. विनय कोरे यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून खर्डा -भाकरी स्वीकारली. शेतकऱ्यांच्या आवडीची खर्डा – भाकरी मी स्वीकारत आहे. लवकरच ऊसदराबाबत तोडगा निघेल. तशी चर्चा सुरू असल्याची माहिती तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कोरे यांची भेट घेऊन त्यांना खर्डा -भाकरीची शिदोरी दिली. जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पाटील, संपतराव पवार, पन्हाळा तालुकाध्यक्ष अजित पाटील, शिवाजी आंबेकर, आण्णा मगदूम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here