कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही रास्त व योग्य भाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी १ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते येथे आयोजित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना शेट्टी यांनी ऊस, कापूस आणि सोयाबीनसाठी केंद्र सरकार हमीभाव कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याबद्दल टीका केली.
शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज समाधीचे दर्शन घेऊन १ जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. शेट्टी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले होते. आताचे राजकारणी त्यांच्या (छत्रपती शिवाजी महाराज) नावाने मते मागत आहेत, पण त्यांची धोरणे राबवत नाहीत. बैठकीत राज्य कार्यकारिणीने ऊस, कापूस आणि सोयाबीनच्या रास्त भावासाठी आंदोलन सुरू करणे, खासदार ब्रिजभूषण यांना अटक करणे यासह चार ठराव मंजूर केले. यावेळी डॉ.जालंधर पाटील, सावकार मादनाईक, प्रकाश पोपके, गजानन बंगले, विठ्ठल मोरे, पोपट मोरे आदी उपस्थित होते.