चीनसोबत साखर निर्यातीची ‘गोड करार’; महाराष्ट्रातील कारखान्यांची अपेक्षा

पुणे चीनी मंडी भारताकडून साखर निर्यात करण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनचे शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भेटी देऊन भारतातील साखर उद्योगाची माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यात चीनसोबत साखरेचा गोड करार’ होण्याची साखर कारखान्यांना विशेषतः महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अपेक्षा आहे.

चीनचे शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर असून, त्यांनी आतापर्यंत दिल्लीतील बैठकानंतर उत्तर प्रदेशला भेट दिली आहे. त्यांचे शिष्टमंडळ १२ डिसेंबर रोजी महाराष्ट्राला भेट देणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलिप वळसे-पाटील यांनी अतिशय सकारात्मक विधान केले आहे. या वर्षी देशातून २० लाख टन साखर चीनला निर्यात होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. सध्या चीनच्या सीओएफसीओ या साखरेशी संबंधित संस्थेशी भारताने १५ लाख टन कच्ची साखर विकण्याचा करार केला आहे.

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ५ लाख टन साखर चीनला निर्यात करण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनचे शिष्टमंडळ सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राजारामबापू शेतकरी सहकारी कारखान्याला भेट देणार असल्याचे खटाळ यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी एक बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

खटाळ म्हणाले, भारतातून यंदा ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट आहे. त्यातील १५ लाख ५४ हजार निर्यात कोटा महाराष्ट्राच्या वाट्याला आला आहे. आम्हाला किमान ५ लाख टन साखर निर्यातीचा करार होईल, अशी अपेक्षा आहे. साखर कारखाने यापेक्षा जास्त साखर निर्यात करण्याच्याही तयारीत आहेत.

भारताने चीनला त्यांना लागणारा कच्च्या साखरेचा कोटा लवकरात लवकर जानेवारीपूर्वी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. कारण जानेवारीनंतर देशातील साखर कारखाने कच्च्या साखरेचे रिफाइन्ड शुद्ध साखरेत रुपांतर करण्यास सुरुवात करतील. त्यानंतर मात्र कच्च्या साखरेचे करार करणे अवघड होणार आहे. यापूर्वीच्या अनुभवानुसार चीन सरकार जानेवारी ते जून दरम्यान लागणारा कोटा जानेवारीच्या मध्यात जाहीर करते. त्यामुळे भारतातील साखर निर्यातदारांच्या म्हणण्यानुसार जर डिसेंबरमध्येच चीनने त्यांना लागणारी कच्ची साखर जाहीर केली. तर, त्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.

चीनला लागते कच्ची साखर

चीनमध्ये केवळ कच्ची साखर आयात केली जाते. भारतात कच्ची साखर आणि रिफाइन्ड साखर तयार करण्यासाठी कारखान्याच्या कामात बदल करावा लागतो. एक दिवस कारखाना बंद करून कच्ची साखर तयार करण्याच्या प्रक्रियेला रिफायन्ड साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत आणावे लागते. त्यामुळे साखर कारखान्यांना आधीच माहिती मिळाली, तर त्यांना तयारी करणे सोपे जाणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या म्हणण्यानुसार चीनही भारतासाठी मोठी बाजारपेठ ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठीच चीनच्या शिष्टमंडळाचा पाहुणचार संघाकडून सुरू आहे. त्यांच्याकडून भविष्यातील मोठे करार करून घेण्याचा साखर कारखाना संघाचा प्रयत्न आहे.

भारतातून आतापर्यंत पश्चिम आशियातील काही देश आणि श्रीलंकेशी एकूण ८ लाख टन साखर निर्यातीचा करार करण्यात आला आहे. यातील सहा लाख टन साखर कच्ची तर उर्वरीत दोन लाख रिफाइन्ड साखर निर्यात करण्यात येणार आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here