शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर आता होणार कारवाई

पुणे : गळीत हंगामात ऊस पिक चांगले नाही, ऊस खराब आहे, पडलेला आहे. क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नसल्याची कारणे देत काही ठिकाणी ऊस तोडणी मजूर व मुकादमांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. शेतकऱ्यांनी तोडणी मजूर व मुकादमांच्या मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस
टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्त कार्यालयाकडे आल्या आहेत. असे प्रकार आढळल्यास कारवाई करा असे आदेश राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

याबाबतच्या अध्यादेशात साखर आयुक्तांनी म्हटले आहे की, राज्यात चालू २०२१-२२ या गाळप हंगामात उपलब्ध असलेला ऊस साधारणत: १४५-१५० दिवसात गाळप होऊ शकतो, इतकी कारखान्यांची क्षमता आहे. उर्वरीत ऊस इथेनॉल उत्पादनाकडे वळवला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या उसाचे गाळप होईल की नाही याची शंका घेऊ नये. प्रादेशिक सह संचालक (साखर) व साखर आयुक्त कायालयाचे स्तरावरही ऊस गाळपाचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी जाहीर सूचना देऊन अशा प्रकरणातील गैरव्यवहाराला आळा बसेल असे पाहावे. कारखान्याच्यावतीने तक्रार करण्यासाठी मोबाईल फोन/व्हॉट्सॲप क्रमांक जारी करावा. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी प्रसिद्धीस द्यावी सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या जनरल मॅनेजर, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशा स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. गाव पातळीवरही तक्रारी घेता येतील अशी व्यवस्था करावी असे साखर आयुक्तांनी कळवले आहे. शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ईमेलचा तक्रारींसाठी वापर करावा. ऊस उत्पादक शेतकऱयांची ऊस तोडणी मजूर / मुकादम / वाहतूकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याची एकही तक्रार चालू गाळप हंगामात येणार नाही याची दक्षता घ्यावी असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here