गडहिंग्लज साखर कारखान्याचे दप्तर आठवड्यात ताब्यात घ्या : प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने

कोल्हापूर: चाचणी लेखापरीक्षणासाठी गडहिंग्लज कारखान्याचे दप्तर रीतसर ताब्यात घेण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करावी, अशी सूचना प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी केली.सेवानिवृत्त कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात येथील प्रांतकचेरीत संयुक्त बैठक झाली.यावेळी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचे अधीक्षक एस. आर. काळे, लेखापरीक्षण विभागाचे प्रतिनिधी बी. डी. खाडे, गोडसाखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत व कामगार उपस्थित होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सात संचालक आणि सेवानिवृत्त कामगार संघटनेने केलेल्या तक्रारीनुसार कारखान्याच्या चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत.परंतु, लेखापरीक्षणासाठी कारखान्याकडून दप्तर उपलब्ध होत नसल्याचे खोत यांनी निदर्शनास आणून दिले.

लेखापरीक्षण विभागाने सात दिवसांत प्रस्ताव पाठवावा आणि त्यानुसार दप्तर ताब्यात घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अशी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी केली.कारखाना आणि ‘ब्रिस्क’ कंपनी यांच्याकडून कामगारांचे हक्काचे पैसे थकले आहेत.त्यासाठी दीर्घकाळ संघर्ष आणि न्यायालयीन लढाई करूनही प्रतिसाद मिळालेला नाही, असे खोत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here