डिंडिगुल : जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील जनसुनावणीमध्ये सहभागी होत अनेक शेतकऱ्यांनी ऊस तसेच भाताच्या खरेदी दरात वाढ करण्याची मागणी मंत्र्यांकडे केली. कृषीमंत्री एम. आर. के. पन्नीरसेल्वम, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आर. सक्करापानी, ग्रामीण विकास मंत्री आय. पेरियास्वामी आणि जिल्हाधिकारी एस. विसाकन यांनी कृषी बजेटपूर्व बैठकीत सहभाग घेतला.
डिंडिगुल, थेनी, तिरुची, करुर आणि तिरुपूर जिल्ह्यातील जवळपास ३१ शेतकऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, डीएमकेने आपल्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात ऊसाचा खरेदी दर वाढवून ४,००० रुपये प्रती टन आणि भाताचा खरेदी दर वाढवून २,५०० रुपये प्रती क्विंटल करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता सरकारने केली पाहिजे. यावर उत्तर देताना कृषी मंत्री एम. आर. के. पन्नीरसेल्वम यांनी सांगितले की, डीएमके आपल्या उर्वरीत तीन वर्षांच्या कार्यकाळात या आश्वासनांची पूर्तता करेल.