तनपुरे साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

अहमदनगर : डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक घेण्यासाठी प्रशासकांकडून हालचालींना वेग आला आहे. येत्या १५ दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाच वर्षांपूर्वी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्यासाठी विखे- तनपुरे गटात चुरशीने निवडणूक झाली. यात सभासदांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे कारखान्याची सूत्रे दिली. या कालावधीत संचालक मंडळाने गाळप यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. हा कालावधी संपल्यानंतर निवडणुकीसाठी ३२ लाख रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही रक्कम वेळेत भरली न गेल्याने कारखान्यावर प्रशासक म्हणून उपनिबंधक गणेश पुरी यांची नेमणूक केली होती. त्यानंतर पुरी यांच्याकडून पदभार काढून तो राहुरीचे सहायक निबंधक पराये यांच्याकडे दिला आहे.

प्रशासकांनी कारखान्याच्या निवडणुकीसाठी १० लाख रुपये भरले आहेत. आता या संदर्भात प्रादेशिक साखर सहसंचालकांनी राज्याच्या सहकार विभागाच्या सचिवांकडे मार्गदर्शन मागितले आहे. ही रक्कम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे भरली आहे. आता पूर्ण ३२ लाखांची रक्कम भरावी लागेल की कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता १० लाखांच्या रकमेतच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकांचा कार्यक्रम लागू शकतो असे अहमदनगरचे साखर सहसंचालक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here