धाराशिव : मराठवाड्यातील सर्वात जास्त गाळप क्षमता असलेला पण गेल्या तब्बल दहा वर्षापासून बंद स्थितीत असलेल्या तेरणा साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा पुन्हा सुरु होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ समूहाने २५ वर्षांच्या भाडेकराराने कारखाना चालवण्यास घेतला आहे.
गेल्या चार महिन्यापासून भैरवनाथ समूहाने गाळप हंगामाची जोरदार तयारी केली आहे. प्रशासनाने यंदा ७ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यातर्फे नुकताच तोडणी वाहतूक कराराचा शुभारंभ करण्यात आला. गाळपासाठी कारखान्याकडे आतापर्यंत सहा हजार हेक्टर उसाची नोदणी झाली आहे. ऊस वाहतुकीसाठी २५० ट्रैक्टर, ५० ट्रक, ७०० बैलगाडीचा करार करण्यात आला आहे. त्याचबरोबर हार्वेस्टर मशीनसाठीही करार करण्यात येणार आहेत. दिव्य मराठीशी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संपादक विक्रम उर्फ केशव सावंत म्हणाले कि, तेरणा कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने चालविण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यासाठी यंदा तब्बल ७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.