ऊसदर प्रश्नावरून मराठवाड्यातही वातावरण तापले : आमदार अमित देशमुखांच्या कारखान्याचे गाळप बंद पाडले

नांदेड : मराठवाड्यातही ऊस दर आंदोलन पेटले असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या खासगी कारखान्यांचे गाळप बंद पाडले. दुष्काळी परिस्थिती व‌ ऊस टंचाई लक्षात घेता यावेळी पहिली उचल 2700 तर अंतिम भाव 3000 देण्यात यावा, अशी मागणी स्वभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मालकीच्या `ट्वेन्टी वन शुगर शिवडी` (ता. लोहा जि. नांदेड ) येथे खासगी साखर कारखाना आहे. या कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी उसाला प्रतिटन २७०० रुपये एकरकमी एफआरपी जाहीर करावी या मागणीसाठी गुरुवारी सकाळी सुरु केलेले ठिय्या आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. स्वाभिमानी शेतकरी संघटना, ऊस उत्पादक शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा झाली, पण तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच होते.

शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणारे वाहने रोखून धरल्याने गाळप बंद पडले आहे. हे ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशी ही सुरूच आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील- राजेगोरे यांनी दिली. दरम्यान, यंदाच्या गाळप हंगामात मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या एफआरपीपेक्षा दोनशे रुपये प्रति टन जादा देण्याची मागणी शिवसेना शेतकरी नेते तथा ऊस नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य (शिवसेना शिंदे गट) प्रल्हाद इंगोले यांनीही केली आहे. यंदाच्या गाळप हंगामात ऊसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. नांदेड विभागात येणाऱ्या नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांना ऊस गाळपाची परवानगी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here