खर्चिक विवाह टाळून वाचवलेली रक्कम दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

मुंबई, दि. ४: धुळे जिल्ह्यातील कल्पेश आण‍ि प्रियंका देवरे या नव विवाहित दाम्पत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करुन लग्न समारंभाच्या आयोजनात वाचवलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २ लाख ५१ हजारांचा धनादेश आज सुपूर्द केला.

बोरीस (ता. जि. धुळे) येथील प्रगत‍िशील शेतकरी परशुराम भाईदास देवरे यांचे सुपूत्र कल्पेश आण‍ि उंभरे (ता. साक्री, जि. धुळे) येथील प्रगत‍िशील शेतकरी संजय काश‍िनाथ सोनवणे यांची कन्या प्रियंका यांचा विवाह निश्चित करण्यात आला. त्यावेळी वर-वधू आण‍ि दोन्ही बाजुच्या कुटुंबियांनी खर्चिक समारंभाचे आयोजन टाळण्यावर सहमती दर्शवली. साधेपणाने विवाह करुन वाचवलेला पैसा, राज्यातील सध्याच्या दुष्काळ निवारण कार्यासाठी मदत म्हणून देण्याचा निश्चय करुन नोंदणी पद्धतीने व‍िवाह लावण्यात आला.

कल्पेश आण‍ि प्रियंकासह त्यांच्या आई-वड‍िलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात आज (दि. ४) भेट घेऊन २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. माजी आमदार प्रा. शरद पाटील या कुटुंबियांसमवेत उपस्थ‍ित होते. समाजासमोर घालून दिलेल्या या आदर्शाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नव दाम्पत्याचे तसेच देवरे आण‍ि सोनवणे कुटुंबियांचे अभ‍िनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here