देशात आतापर्यंत २५८.६८ लाख टन साखर उत्पादन

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या गळीत हंगामात १५ मार्च २०२१ पर्यंत २५८.६८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी, १५ मार्च २०२० अखेर २१६.१३ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात ५०२ साखर कारखाने सहभागी झाले आहेत. मात्र गेल्यावर्षी ४५८ कारखान्यांनी गाळप केले. यंदा १५ मार्च २०२१ पर्यंत १७१ कारखान्यांनी गाळप बंद केले असून ३३१ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी १५ मार्च २०२० पर्यंत १३८ कारखान्यांनी गाळप बंद केले होते तर ३१९ कारखाने सुरू होते.

महाराष्ट्रात १५ मार्च २०२१ पर्यंत साखरेचे उत्पादन ९४.०५ लाख टन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ५५.८५ लाख टन उत्पादन झाले होते. सध्या २०२०-२१ या हंगामात ४८ कारखान्यांनी गाळप बंद केले. त्यातील बहुतांश कारखाने सोलापूर विभागातील आहेत. उर्वरीत १४० कारखान्यांचे गाळप सुरू आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ५६ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते. तर ९० कारखाने सुरू होते. महाराष्ट्रात चालू हंगामात मराठवाडा आणि अहमदनगर विभागातील कारखाने पुढील आठवड्यात बंद होतील. मात्र, कोल्हापूर, सातारा आणि सांगली विभागातील कारखाने एप्रिलपर्यंत चालतील.

उत्तर प्रदेशमध्ये १२० कारखान्यांनी १५ मार्च २०२१ पर्यंत ८४.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले. यापैकी १८ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. हे बहूतांश कारखाने पूर्व उत्तर प्रदेशमधील आहेत. गेल्यावर्षी राज्यात ११८ कारखान्यांनी गाळप केले होते. १५ मार्च २०२० पर्यंत ८७.१६ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते.

कर्नाटकमध्ये १५ मार्च २०२१ पर्यंत ६६ कारखान्यांनी ४१.३५ लाख टन साखरेचे उत्पादन केले. ६६ पैकी ६२ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. आता फक्त ४ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत ६३ कारखान्यांनी ३३.३५ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. ६३ पैकी ५० कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते. १३ कारखाने १५ मार्च २०२० पर्यंत सुरू होते. सद्यस्थितीत आणि जुलै-सप्टेंबर या तिमाहीतील स्थिती पाहता राज्यात ४२.५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे.
गुजरातमध्ये १५ मार्च २०२१ पर्यंत ८.४९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील १५ पैकी २ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. गेल्यावर्षीही अशीच स्थिती होती. मात्र, २ साखर कारखान्यांनी १५ मार्च २०२० पर्यंत गाळब बंद केले होते. एकूण ७.७८ लाख टन साखर उत्पादन केले होते.

तामिळनाडूमध्ये २६ कारखान्यांनी २०२०-२१ च्या हंगामात आतापर्यंत ४.०१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी २३ कारखान्यांनी ४.१२ लाख टन साखर उत्पादन केले होते. उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगाणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओडिसामध्ये एकूण २६.५३ लाख टन साखरेचे उत्पादन १५ मार्चअखेर झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here