नवी दिल्ली : देशात यंदा साखर उत्पादन उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. देशभरातील ४७१ साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत जवळपास ७५ लाख टनाहून अधिक साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात साखर हंगामात ३१५ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ३१.९० लाख टन उत्पादन सर्वोच्च स्तरावर आहे. हंगामाच्या अखेरीपर्यंत राज्यात साखरेचे उत्पादन ११० लाख टन होण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार हे उत्पादन सर्वाधिक असेल. महाराष्ट्रात १८४ साखर कारखाने गाळप करीत आहेत. त्यापाठोपाठ ११७ कारखाने गाळप करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत १८.६० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. हंगामाच्या अखेरपर्यंत ते १०७ टनापर्यंत पोहोचेल. साखर उत्पादनात कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील ६९ कारखान्यांनी १७.९० लाख टन साखर उत्पादन केले आहे. हंगामाच्या अखेरपर्यंत ते ४८ लाख टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
देशभरातील ४७१ साखर कारखान्यांनी एकूण ८२०.७३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या यादीत महाराष्ट्र अग्रस्थानी असून १५ डिसेंबरपर्यंत ३४१.१८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कर्नाटक द्वितीय स्थानी असून १९८.८९ लाख टन ऊस गाळप झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये १९७.८७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. उर्वरीत राज्यातील गाळपामध्ये गुजरातमध्ये २३.७३ लाख टन ऊस गाळप आणि २.१० लाख टन साखर उत्पादन, हरियाणात १३.५८ लाख टन ऊस गाळप आणि १.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. बिहारमध्ये १२.५७ लाख टन ऊस गाळप आणि १.१५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. उत्तराखंडने ९ लाख टन ऊस गाळप आणि ०.९० लाख टन साखर उत्पादन केले आहे.
पंजाबमध्ये ६.८६ लाख टन ऊस गाळप करून ०.६० लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात ६.२५ लाख टन ऊस गाळप करून ०.५० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तामिळनाडूत ५.८८ लाख टन ऊस गाळप आणि ०.५० लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे. तेलंगणात २.५० लाख टन ऊस गाळप करून ०.२० लाख टन साखर उत्पादन तर आंध्र प्रदेशात १.२५ लाख टन ऊस गाळप करून ०.१० लाख टन साखर उत्पादन करण्यात आले आहे.
देशभरात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र वाढले असून प्रगत ऊस बियाणे, हमीभाव यामुळे यात वाढ होताना दिसून आली आहे. आतापर्यंत, देशभरातील ४७१ कारखान्यांनी ८२० लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. त्याचा सरासरी साखर उतारा ९.२२ टक्के आहे. गेल्यावर्षी १५ डिसेंबर २०२० पर्यंत ४५८ कारखान्यांनी ८१९.५७ लाख टन ऊसाचे गाळप करून ७४ लाख टन साखर उत्पादन केले होते. तर साखर उतारा ९.०२ टक्के होता. यावर्षी उच्चांकी गाळप हंगाम गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगला आहे. हंगामातील सरासरी साखर उतारा अनुक्रमे उत्तराखंडमध्ये १० टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ९.४० टक्के, महाराष्ट्रात ९.३५ टक्के, बिहारमध्ये ९.१५ टक्के, कर्नाटकात ९ टक्के आहे. गुजरातमध्ये ८.८५ टक्के, पंजाबमध्ये ८.७५ टक्के तामीळनाडूत ८.५० टक्के, हरियाणात ८.१० टक्के आणि आंध्र प्रदेशात ८ टक्के असा आहे.
कोविड महामारीच्या काळात ऊसाच्या शेतीमध्ये आणि साखर उत्पादनात वाढ झाली आहे. महामारीच्या काळात निर्बंधात सूट दिल्याचा फायदा साखर उद्योगाला झाला आहे. त्यामध्ये साखर विक्री आणि विक्रीच्या दरात वाढ दिसून आली आहे. दुसरीकडे इथेनॉल उत्पादन योजनेला गती मिळाली आहे. ३० नोव्हेंबर रोजी संपलेल्या २०२०-२१ या वर्षात देशातील २७५ डिस्टीलरींनी तेल कंपन्यांना उच्चांकी ३०२.३० कोटी लिटर इथेनॉल पुरवले. इथेनॉल पुरवठा करून यावर्षी २०,००० कोटी रुपयांची कमाई झाली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, देशभरात यावर्षी साखर कारखान्यांना साखर निर्यातीत यश मिळाले आहे. २०१९-२० मध्ये ५९ लाख टन साखर निर्यात केल्यानंतर २०२०-२१ मध्ये उच्चांकी ७२ लाख टन साखर निर्यात करण्यात आली. यावर्षी पहिल्या तिमाहीत साखर कारखान्यांनी ३५ लाख टन निर्यातीचे करार केले आहेत. त्यात सहकारी कारखान्यांचा वाटा ४० टक्क्यांचा आहे.