देशाचा कृषी निर्यातीला मिळाली शानदार गती

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील निर्यातीने देशासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांसह नव्याने बाजारपेठेत आलेल्या उत्पादनांच्या विस्तारामुळे हे शक्य झाल्याची माहिती वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी दिली.
गेली तीन वर्षे निर्यात स्थिर राहिली. त्यानंतर २०२०-२१ या कालावधीत कृषी आणि संबंधित उत्पादनांची निर्यात १७.३४ टक्क्यांनी वाढून ४१.२५ अब्ज डॉलर झाली. २०१७-१८ आणि २०१८-१९ मध्ये ही निर्यात साधारणतः ३८ बिलियन डॉलर होती. २०१९-२० मध्ये निर्यात घटून ३५.१६ बिलियन डॉलर झाली आहे. वाधवान यांनी प्रसारमाध्यमांशी व्हर्च्युअल बैठकीत सांगितले की चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात निर्यातीने ४३ टक्क्यांची उसळी घेतली आहे.

वाधवान म्हणाले, भारताला धान्य, बासमती वगळता इतर तांदूळ, गहू, बाजरी, मक्का आणि इतर धान्याच्या निर्यातीत वाढ दिसत आहे. भारतीय कृषी उत्पादनांना अमेरिका, चीन, बांगलादेश, संयुक्त अबर अमिरात, व्हिएतनाम, सौदी अरेबीया, इंडोनेशिया, नेपाळ, ईराण आणि मलेशियाची बाजारपेठ उपलब्ध आहे. निर्यातीत सर्वाधिक वाढ इंडोनेशिया (१०२.४२ टक्के), बांगलादेश (९५.९३ टक्के) आणि नेपाळ (५०.४९ टक्के) नोंदविण्यात आली आहे.

वाणिज्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव दिवाकर नाथ मिश्रा यांनी सांगितले की, भारतीय धान्याची मागणी २०२०-२१ मध्ये मजबूत आहे. पहिल्यांदा अनेक देशांना शिपमेंट पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये तिमोर-लेस्ते, प्यूर्टो रिको, ब्राझिलला तांदूळ पाठविण्यात आला आहे. अशाच पद्धतीने येमेन, इंडोनेशिया, भूतानसारख्या देशांना गहू पाठविला आहे. इतर धान्य सुदान, पोलंड, बोलिव्हीयाला निर्यात करण्यात आले. अनेक देशांना आरोग्यवर्धक बाजरी, आले, हळदीची मागणी वाढली आहे.
कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादक निर्यात विकास प्राधिकरणाचे (एपेडा) अध्यक्ष एम.अंगमुथू यांनी सांगितले की सेंद्रीय उत्पादनांची मागणी वाढली आहे. यामध्ये तांदूळ, बाजरी, मसाले, चहा, औषधी वनस्पतींची उत्पादने, सुका मेवा आणि साखर यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here