नवी दिल्ली : अन्न खात्याचे सचिव सुधांशू पांडे यांनी देशांतर्गत दर अधिक झाल्यामुळे साखरेच्या किमान समर्थन दरात वाढ होण्याची शक्यता फेटाळून लावली. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या हंगामात साखरेची निर्यात ५०-६० लाख टनापर्यंत पोहोचू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साखरेचा सध्याचा किमान विक्री दर (एमएसपी) ३१ रुपये प्रती किलो आहे.
इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) ८७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सचिव पांडे यांनी सांगितले की, इथेनॉल उत्पादनाची साठवणूक करण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज आहे. हरित इंधनाचे उत्पादन हा आगामी काळातील मुख्य घटक असेल. पांडे यांनी सांगितले की, २०२०-२१ या हंगामात निर्यात वाढून ७० लाख टनावर पोहोचली. २०१७-१८ मध्ये ही निर्यात अवघ्या ६.३ लाख टन होती. यावर्षी ही निर्यात ५०-६० लाख टनापर्यंत राहील असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा साखरेच्या दराच घसरण होत होती, तेव्हा किमान विक्री दर पद्धती लागू करण्यात आली. आता साखरेचे दर वाढत आहेत.
ही प्रणाली कायम राहील की नाही या प्रश्नावर ते म्हणाले, हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असेल. मात्र, सध्या एमएसपीची गरज नाही, असे पांडे यांनी स्पष्ट केले.