कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक दुसऱ्यांदा निष्फळ

कोल्हापूर : ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी आयोजित साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक दुसऱ्यांदा निष्फळ ठरली. कारखानदार म्हणतील तोच दर आम्ही मान्य करणार नाही. याबाबत कारखान्यांनी पुढाकार घेऊन तोडगा काढावा. आम्ही दोन पाऊले मागे येण्यास तयार आहोत, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. गेल्या हंगामातील उसाला प्रती टन ४०० रुपये द्यावेत आणि नवा दर जाहीर करावा, या मागणीसाठी गुरुवारी कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, कोणताही निर्णय झाला नाही.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. साखर कारखानदारांचे कार्यकारी संचालक व अन्य अधिकारी उपस्‍थित होते. कारखानदार प्रतिनिधींनी मागील दर देण्याबाबतच्या अडचणी मांडल्या. मात्र, शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी दराबाबत ठाम राहिले. शेट्टी म्हणाले, की जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचा मला तोडग्यासाठी दूरध्वनीने विनंती केली आहे. माझी एक पाऊल पुढे येऊन तोडगा काढण्याची तयारी आहे. परंतु कारखानदारांनी फुटकळ दर देवून तोडगा काढला म्हणू नये. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास आमची संघटनाही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहे, अशा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here