ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपातीचा अचानक निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने एक वर्षात एकाच दिवशी जादा उसळी घेतली. आगामी काळात क्रूड ऑईल १०० डॉलर प्रती बॅरलच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना (ओपेक) आणि रशियासह अनेक सहयोगींनी एका दिवस आधी कच्च्या तेलाचे उत्पादन ११.६ लाख बॅरल प्रती दिन कपातीची घोषणा केली आहे. क्रूडमधील सुधारणेनंतर कपातीच्या घोषणेने बाजाराला मोठा झटका बसला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यामुळे ब्रेंट क्रूड ५.४ टक्के महाग होवून ८४.२२ डॉलर प्रती बॅरलवर ट्रेड करीत होता. डब्ल्यूटीआय क्रूड ५.५ टक्के वाढून ७९.८४ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले आहे. कपातीच्या घोषणेनंतर गोल्डमॅन सॉक्सने ओपेक देशांसाठी २०२३ च्या अखेरपर्यंत उत्पादन पुर्वानुमान घटवून ११ लाख बॅरल केले आहे. यामुळे २०२३ मध्ये ब्रेंट क्रूड ९५ डॉलर प्रती बॅरल आणि २०२४ मध्ये १०० डॉलर प्रती बॅरलच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. कच्च्या तेलाच्या दरात वाढीमुळे भारतातील आयात क्रूडच्या दरातील स्थिती बदलेल. यातून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरात तेजी येवू शकते. भारताने गेल्या महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात आयात क्रूडचा दर ७३ ते ७४ प्रती डॉलर होता.