पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जुनागड येथे 3580 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या प्रकल्पांची कोनशीला रचली. जुनागड येथील या प्रकल्पांमध्ये तटवर्ती महामार्गांच्या सुधारणांसोबत जोडमार्गाचे बांधकाम, दोन पाणीपुरवठाप्रकल्प आणि कृषी उत्पादनांच्या साठवणीसाठी वखार संकुलाची उभारणी या कामांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी यावेळी, माधवपूर येथील कृष्ण रुक्मिणी मंदिराच्या समग्र विकासकामाची आणि पोरबंदर मच्छिमार बंदरात सांडपाणी तसेच पाणीपुरवठा प्रकल्प आणि देखभालविषयक ड्रेजिंगसाठीच्या कामाची देखील कोनशीला रचली. गीर सोमनाथ येथे पंतप्रधान मोदी यांनी माधवगड येथील मच्छिमारी बंदराच्या विकास कामासह दोन प्रकल्पांची कोनशीला रचली.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, खेळीमेळीच्या सुरात पंतप्रधान म्हणाले की, दिवाळी तसेच धनत्रयोदशीचे सण यावेळी लवकर आले आहेत आणि जुनागडच्या लोकांनी नववर्षाच्या उत्सवाची तयारी आधीच सुरु केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधानांनी जनतेला त्यांच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद दिले. पूर्वीच्या काळात गुजरात राज्याचा अर्थसंकल्प असेल तेवढ्या मूल्याच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गुजरातच्या जनतेमुळे हे साध्य झाले आहे असे ते म्हणाले.
जुनागड, गीर सोमनाथ आणि पोरबंदर मिळून झालेल्या भागाला गुजरातची पर्यटन राजधानी संबोधून पंतप्रधान म्हणाले की, आज नियोजन होत असलेले प्रकल्प, रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण करणार आहेत. “आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे,” अशी भावना व्यक्त करून पंतप्रधानांनी याचे श्रेय गुजरातची जनता आणि त्यांच्या आशिर्वादाला दिले. ते म्हणाले की केंद्र सरकारमधील जबाबदाऱ्या घेण्यासाठी त्यांना गुजरात राज्यातून दिल्लीत जावे लागले असले तरीही मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्याच मूल्यांची आणि परंपरांची जपणूक करून गुजरातच्या जनतेची चांगली काळजी घेतली आहे. “आज गुजरात जलदगतीने विकसित होत आहे,” पंतप्रधान म्हणाले.
येथे पडलेला दुष्काळ आणि त्यामुळे या भागातून स्थलांतर यासारख्या कठीण काळाची त्यांनी आठवण काढली. पंतप्रधान म्हणाले की जे लोक समर्पित भावनेने आणि खरेपणाने काम करतात त्यांना निसर्गदेखील मदत करतो. गेल्या दोन दशकांमध्ये या भागातील हवामानविषयक समस्या कमी झाल्या आहेत त्यावरून हे सिध्द होते असे ते म्हणाले. “एकीकडे जनतेचा आशीर्वाद आणि दुसरीकडे निसर्गाचा पाठींबा यामुळे लोकांची सेवा करण्यात आयुष्य व्यतीत करण्यात समाधान वाटते,” पंतप्रधान म्हणाले. नर्मदा माता हे तीर्थयात्रेचे दुर्गम ठिकाण होते याकडे निर्देश करून ते म्हणाले की लोकांच्या मेहनतीमुळे आता नर्मदा माता आशीर्वाद देण्यासाठी सौराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचली आहे. संपूर्ण समर्पितपणे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या जुनागडच्या शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. गुजरातमध्ये पिकणाऱ्या केशर आंब्यांची चव आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
भारताच्या भव्य सागर किनारी प्रदेशांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी त्यातील मोठा भाग गुजरातमध्ये येतो याकडे लक्ष वेधले. पूर्वीच्या सरकारांनी समुद्रांना ओझ्याप्रमाणे वागविले आणि ताज्या सागरी हवेला विषाचे नाव दिले याचे स्मरण उपस्थितांना करून देऊन मोदी म्हणाले की आता काळ बदलला आहे. “आपत्ती समजले गेलेले तेच समुद्र आता आपल्या प्रयत्नांची फळे देत आहेत.” समस्यांनी ग्रस्त असलेले कच्छचे रण आता गुजरातच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरत आहे असे ते पुढे म्हणाले. गुजरातच्या विकासासाठी 25 वर्षांपूर्वी केलेल्या माझ्या निर्धाराला आता फळे धरत आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपण मच्छिमार समुदायाला कल्याण, सुरक्षितता, सुविधा आणि पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी सागर खेडू योजना सुरू केली होती अशी आठवण पंतप्रधानांनी काढली. अशा प्रयत्नांमुळे, राज्याची मासे निर्यात सात पटींनी वाढली. गुजरातचे मुख्यमंत्री असताना घडलेली एक घटना त्यांनी सांगितली. ते म्हणाले की, त्यावेळी जपानी प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी मासेमारीशी संबंधित उपक्रमांविषयी सुरु असलेले सादरीकरण थांबवायला सांगितले कारण पडद्यावर दिसणाऱ्या प्रसिद्ध सुरमई माशांची छायाचित्रे पाहून ते स्वतःला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी ते मासे खाण्याची इच्छा व्यक्त केली. आज जपानी बाजारात सुरमई हा लोकप्रिय मासा आहे आणि आता दर वर्षी देशातून लक्षणीय प्रमाणात या माशांची निर्यात केली जाते अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. “दुहेरी इंजिन सरकारने विकासकामांमध्ये दुप्पट वेग आणला आहे,” ते म्हणाले. या भागात तीन मासेमारी बंदरांचे काम आजच सुरु करण्यात आले आहे.
देशात प्रथमच शेतकरी, पशुपालक आणि सागर खेडू मच्छिमार यांना किसान क्रेडीट कार्ड योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या योजनेने बँकेकडून कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. “याचा परिणाम म्हणून साडेतीन कोटी लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत,” मोदी पुढे म्हणाले. या योजनेने समाजातील गरीब आणि गरजूंना स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी अधिक उत्तम भविष्य उभारण्याच्या दृष्टीने सक्षम होण्याची संधी मिळाली अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की जे लाभार्थी वेळेवर कर्जाची परतफेड करत आहेत त्यांचे व्याज माफ केले जाणार आहे.
‘’आमच्या पशुपालकांचे आणि मच्छीमार बांधवांचे किसान क्रेडिट कार्डमुळे जीवन खूप सुकर झाले आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान पुढे म्हणाल, “गेल्या दोन दशकांमध्ये बंदरांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्यामुळे गुजरातच्या समृद्धीचे दरवाजे खुले झाले आहेत. गुजरातसाठी नवीन संधी खुल्या झाल्या आहेत.सागरमाला योजनेवर पंतप्रधानांनी सांगितले की, सरकारने बंदरांचा विकास करण्यासोबत बंदरांच्या नेतृत्वाखाली विकास कामे कार्यान्वित केली आहेत. भारताच्या किनारपट्टीवरील भागामध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
“गुजरातच्या किनारपट्टीवर बंदरांवर आधारित अनेक नवीन प्रकल्प सुरू झाल्याचे दिसून येत आहेत”, असे सांगून पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “जुनागड व्यतिरिक्त, पोरबंदर, जामनगर, देवभूमी द्वारका, मोरबीपासून नवीन सागरी किना-यावरील महामार्ग, मध्य आणि दक्षिण गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमधून जाणार आहे.यामुळे गुजरातच्या संपूर्ण किनारपट्टीची संपर्क व्यवस्था मजबूत होऊ शकणार आहे.’’
राज्यातल्या माता-भगिनींनी केलेल्या अतुलनीय कार्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. त्या एक संरक्षक कवच बनल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या 8 वर्षात महिलांच्या विकासासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, माता आणि भगिनींचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रत्येक स्तरावर पावले उचलण्यात आली आहेत. पंतप्रधानांनी महिलांचे आरोग्य सुधारण्याकडे तसेच त्यांचा आदर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे लक्ष वेधले ; आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी शौचालयांच्या निर्मितीचे श्रेय दिले. पंतप्रधानांनी नमूद केले की उज्ज्वला योजनेमुळे महिलांच्या फक्त वेळेची बचत होते असे नाही, तर त्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारत आहे.
याआधीच्या सरकारांकडून खेडेगावात पाण्याचे काही हातपंप दिल्यानंतर आनंदोत्सव साजरा करून खूप मोठा गाजावाजा केला जात होता, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, “आता प्रत्येक घरात वाहिनीव्दारे पाणी पोहोचवले जात आहे.” प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले की, गर्भवतींना पौष्टिक आहार घेता यावा, यासाठी असंख्य प्रकारे मदत या माध्यमातून दिली जात आहे. ‘’आमच्या सरकारकडून पीएम घरकूल योजने अंतर्गत जी घरकुले देण्यात येतात, त्यातील बहुतांश घरे ही महिलांच्या नावावर आहेत”. ते पुढे म्हणाले, “आज आमचे सरकार बचत गटांच्या माध्यमातून खेड्या-पाड्यात महिला उद्योजकतेला व्यापक बनवून या कामाचा विस्तार करीत आहे. देशभरात 8 कोटींहून अधिक भगिनी स्व-मदत गटांशी संबंधित आहेत, त्यापैकी लाखो महिला गुजरातमधील आहेत. त्याचबरोबर अनेक भगिनी मुद्रा योजनेतून मदत घेऊन त्या अंतर्गत प्रथमच उद्योजक झाल्या आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
देशातील युवकांविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 8 वर्षांपासून आम्ही गुजरातसह देशभरातील तरुणांची क्षमता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. शिक्षणापासून रोजगार, स्वयंरोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज सरकार तरुणांना उद्योजकतेच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करत आहे. गांधीनगरमध्ये उद्घाटन केलेल्या संरक्षण प्रदर्शनाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये रणगाड्यांचे उत्पादन लवकरच सुरू होईल, आता तो दिवस काही फार दूर नाही.
शैक्षणिक क्षेत्रात गुजरात राज्याने केलेल्या प्रगतीवरही पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, गेल्या 8 वर्षात देशात शेकडो विद्यापीठे स्थापन झाली. गुजरातमध्ये उच्च शिक्षणाच्या अनेक दर्जेदार संस्था सुरू होत आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात गुजराती भाषेतून शिक्षण दिले जाणार आहे; यामुळे नवीन संधी निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे डिजिटल विकासामुळे गुजरातमधील तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. “डिजिटल इंडियाने गुजरातमधील तरुणांना त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी नवीन संधी दिल्या आहेत, त्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. तरुणांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करणे आता सहज शक्य झाले आहे. आणि स्वस्त ‘मेड इन इंडिया’ मोबाईल फोन आणि त्याचबरोबर स्वस्त डेटा सुविधा असल्यामुळे हे शक्य होत आहे,” असेही पंतप्रधान म्हणाले.
वाढत्या पायाभूत सुविधांमुळे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, या भागातील सर्वात मोठा रोपवे आता कार्यरत झाला आहे. पंतप्रधान म्हणाले की, अनेक वर्षानंतर यावर्षी एप्रिलमध्ये केशोद विमानतळावरून पुन्हा उड्डाणे सुरू झाली आहेत. केशोद विमानतळाचा आणखी विकास झाल्यावर, आणि मालवाहतूक सुविधा झाल्यावर इथून आपली फळे, भाजीपाला, मासे आणि इतर उत्पादने पाठवणे सोपे होईल. केशोद विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे देश आणि जगामध्ये अधिकाधिक ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये इथल्या मालाला प्रवेश मिळेल, येथील पर्यटनात आणखी वाढ होईल, असेही त्यांनी सांगितले.
अंतराळ, विज्ञान किंवा क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय कामगिरीबाबत आपण एक देश म्हणून आनंद साजरा करतो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. तथापि, गुजरात आणि येथील लोकांना मिळणारे यश याचेही राजकारण केले जाते, अशा प्रकारच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. “काही राजकीय पक्षांनी गुजरातला नावे ठेवण्याची, हीन ठरविण्याची, कमी लेखण्याची आपली राजकीय विचारधाराच बनवली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातींचाच नाही तर देशातील कोणत्याही राज्यातील जनतेचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाहिलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ स्वप्नाचे आपण कधीच विस्मरण होऊ देणार नाही. काही जणांकडून केला जाणारा उपहास पाहता, त्याचे रूपांतर आशेमध्ये करण्याची आवश्यकता आहे, याचे तसेच खोट्याचा प्रतिकार हा विकास कामांच्या माध्यमातून करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गुजरातची एकता हीच या राज्याची ताकद असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार राजेशभाई चुडासामा आणि रमेश धाडुक तसेच गुजरात सरकारमधील मंत्री ऋषिकेश पटेल आणि देवाभाई मालम आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी किनारी महामार्गांच्या सुधारणांसोबत जोडरस्त्यांच्या कामाची पायाभरणी केली. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 13 जिल्ह्यांमध्ये एकूण 270 किमी लांबीचे महामार्ग समाविष्ट केले जातील.
जुनागड येथे दोन पाणीपुरवठा प्रकल्प आणि कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम संकुलाच्या बांधकामासाठी पंतप्रधान पायाभरणी, तसेच पोरबंदर येथे, माधवपूर येथील श्रीकृष्ण रूकि्मणी मंदिराच्या सर्वांगीण विकासाच्या कामाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. पोरबंदर मत्स्योउत्पादन बंदर येथे सांडपाणी आणि पाणीपुरवठा प्रकल्प आणि देखभाल दुरुस्तीसाठी त्यांनी पायाभरणी केली. गीर सोमनाथ येथे पंतप्रधानांनी मधवाड येथे मासेमारी बंदराच्या विकासासह दोन प्रकल्पांची पायाभरणी केली.
(Source: PIB)