मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते, आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून राज्याला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली आहे. अपुऱ्या पावसाने राज्यात दुष्काळाचे सावट असून, याकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) पाटील यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. आ. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने दुष्काळ जाहीर करून त्यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलावीत, असे म्हटले आहे. दुष्काळाच्या संकटामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करू शकतात, अशी भीतीही आ. पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
आ. पाटील म्हणाले, राज्यातील काही भागात ऑगस्टमध्ये सरासरीच्या २९ टक्के पाऊस झाला आहे. सध्या 329 महसूल मंडळात दुष्काळाची छाया गडद झाली आहे. कोकण वगळता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. ते म्हणाले की, यंदा राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कमी पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. खरीप हंगामातील बहुतांश पिके नष्ट झाली असून चारा पिकांवर परिणाम झाला असून जनावरांसाठी चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. देशातील ऊस उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा असून दुष्काळी परिस्थिती अशीच राहिल्यास आगामी हंगामात साखर उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.