सलग पाचव्या दिवशी शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स 536 अंकांनी खाली

नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पाच्या आधी, गुरुवारी सलग पाचव्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरू राहिले. आयटी, एफएमसीजी आणि सरकारी बँका यांच्या शेअर विक्रीच्या तडाख्याने बीएसई सेन्सेक्स ५३५.६ अंक म्हणजे १.१३ टक्क्यांनी घसरून ४६८७४.३६ अंकांवर बंद झाला. निफ्टीही १५० अंक म्हणजेच १.०७ टक्के खालावून १३८१७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० पैकी २१ शेअर घसरून बंद झाले. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्समध्ये ३००० हून अधिक अंकांची घसरण झाली आहे.

सेन्सेक्समधील शेअर्सपैकी हिंदूस्थान युनीलिव्हरमध्ये सर्वाधिक ३.६ टक्के घसरण झाली. मारुती सुझुकीचे शेअर ३.४ टक्के, एचसीएल टेक आणि बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये २-२ टक्क्यांची घसरण नोंदण्यात आली. दुसरीकडे अॅक्सिस बँक (५.५ टक्के), एसबीआय (२.७ टक्के) आणि आयसीआयसीआय बँक (१.३ टक्के) यांच्या शेअर्समध्ये तेजी राहिली.
दरम्यान सकाळच्या सत्रात कमकुवत जागतिक स्थितीमुळे एचडीएफसी, टीसीएस, इन्फोसीस आणि आयसीआयसीआय बँक यांसारख्या बड्या शेअर्समुळे सेन्सेक्समध्ये सकाळच्या सत्रात ५२० अंकांची घसरण झाली. या दरम्यान, ३० शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स ५२३.१४ अंक म्हणजेच १.१० टक्क्यांनी घसरून ४६८८६.७९ वर ट्रेड करीत होता.

अशाच प्रकारे एनएसई निफ्टी १६७.८० अंक म्हणजेच १.२ टक्क्यांनी घसरून १३७९९.७० अंकावर आला. सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण २.५ टक्क्यांची घसरण एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये झाली. याशिवाय एचडीएफसी, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, सन फार्मा, पॉवरग्रीड, कोटक बँक, एसबीआय, नेस्ले इंडिया या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरीकडे ओएनजीसी, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचयूएलचे शेअर प्लसमध्ये राहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here