खजिना रिकामा, बत्ती गुल; आता पाकिस्तानात ६२ लाख लोकांचा रोजगार धोक्यात

पाकिस्तानच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये काल वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा सामना करावा लागला होता. पाकिस्तानमधील लोकांना आधीच आटा आणि इतर दैनंदिन गोष्टींसाठी झगडावे लागत आहे. अशातच २०२३ मध्ये लाखो पाकिस्तानी नागरिकांवर त्यांच्या नोकऱ्या आणि रोजगार गमावण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.

आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानसमोर दररोज एक नवी समस्या निर्माण होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य पाकिस्तानींच्या ताटातून भाकरी गायब होऊ लागली आहे. आट्यासारख्या दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. काल वीज संकटामुळे पाकिस्तानातील सुमारे ३० शहरे अंधारात बुडाली होती. हजारो पाकिस्तानी दररोज नोकऱ्या गमावत आहेत. एका अहवालानुसार २०२३ मध्ये लाखो पाकिस्तानी बेरोजगार होतील. म्हणजेच हे संकट आता अधिक गंभीर होणार आहे.

आजतकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या न्यूज वेबसाईट ‘द डॉन’न म्हटले आहे की, २०२३ मध्ये व्यवसाय बंद पडल्यामुळे आणि कारखान्यांमधील उत्पादन कमी झाल्यामुळे सुमारे ६२ लाख लोक बेरोजगार होऊ शकतात. हा आकडा पाकिस्तानच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या ८.५ टक्के आहे. बेरोजगारीच्या भीतीमुळे, पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून लवकरात लवकर मदतीची अपेक्षा आहे. पाकिस्तानातील महागाईचा दर नव्या उंचीवर पोहोचला आहे. पाकिस्तानचा परकीय चलन साठा ४.६०१ अब्ज डॉलर असून तो एका महिन्याच्या आयातीसाठीही पुरेसा नाही.

पाकिस्तानचा परकीय चलन गंगाजळी एवढी कमी झाली आहे की जीवनावश्यक वस्तूंची आयात करणेही अडचणीचे बनले आहे. दैनंदिन गोष्टींसोबतच आटा, गॅस, पेट्रोलपासून ते औषधांचे संकट पाकिस्तानमध्ये गडद झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here