सरकारच्या या दोन निर्णयांचा साखर कंपन्यांना होणार फायदा; उत्पन्न ५-७ टक्के वाढणार

नवी दिल्ली : देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर साखर निर्यात आणि इथेनॉल उत्पादन या दोन्ही बाबतीत अपेक्षित वाढीमुळे साखर क्षेत्रातील कंपन्यांच्या महसुलात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ५ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. इक्राने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशात आणि जागतिक स्तरावर अनुकूल दर, इंधन मिश्रणात इथेनॉलचे वाढते प्रमाण यामुळे साखर उद्योगातील कंपन्यांच्या महसुलात वार्षिक ५ ते ७ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इक्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि समुहाचे प्रमुख सब्यासाची मुजूमदार यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणानुसार इथेनॉल उत्पादन करण्यासाठी साखर उत्पादन मर्यादित करुन इथेनॉल उत्पादनाला गती मिळण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात साखर निर्यातीला असलेली चांगली संधी पाहता साखर साठा कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे उधारीचा स्तर कमी करण्यास मदत मिळेल.

जागतिक पातळीवर चांगल्या दरासह सणासुदीच्या अनुषंगाने तीन वर्षानंतर ऑगस्ट – सप्टेंबर २०२१ मध्ये देशांतर्गत साखरेचा दर वाढून ३४०००-३६००० रुपये प्रती टन झाला. ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचा दर ४२०-४४० अमेरिकन डॉलरवर पोहोचला होता. तर ऑगस्ट – सप्टेंबर २०२० मध्ये हाच दर २७०-२८० डॉलर प्रती टन होता. दरम्यान, महामार्ग आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त साखर साठा वापरावर भर दिला आहे. डब्ल्यूटीओच्या व्यवस्थेअंतर्गत २०२३ पासून साखर निर्यातीवर अनुदानाची तरतूद केली जाणार नाही. इथेनॉल उत्पादनाला अधिक प्रोत्साहन दिला गेला पाहिजे. देशातील सर्व इथेनॉलची खरेदी केली जाईल असे आश्वासन गडकरी यांनी दिले. शंभर टक्के बायो इथेनॉलवर आधारित फ्लेक्स फ्युएल वाहने दाखल झाल्यावर इथेनॉलची मागणी चार ते पाचपटीने वाढेल. साखर कारखान्यांनी इथेनॉल पंप सुरू करावेत. त्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्यासाठी सरकार ३००० ते ६००० कोटी रुपयांचे निर्यात अनुदान देत आहे. बी हेवी मोलॅसीसमध्ये १५ ते २० टक्के साखर मिसळून अतिरिक्त साखर इथेनॉल उत्पादनासाठी वापरली जाऊ शकते असे त्यांनी सांगितले. २०२५ पासून पेट्रोलमध्ये इथेनॉल २० टक्के मिश्रण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी १० अब्ज कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल असे गडकरी यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here