या जिल्ह्यातील २०० गावे दुष्काळी; ऊस गाळप मात्र जोमाने

 

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

कोल्हापूर : चीनी मंडी

महाराष्ट्राच्या काही भागात विशेषतः मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पण, कोल्हापुरात चित्र वेगळे आहे. दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत असूनही जिल्ह्यात उसाचे गाळप जोमदारपणे सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामातील गाळपाच्या तुलनेत यंदा घटही झालेली नाही. उताऱ्यावर मात्र वेगवेगळे चित्र दिसत आहे. पण, पुढील वर्षी उसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरातील दुष्काळ हा प्रत्यक्ष नसून, तांत्रिक आहे. जिल्ह्यात शेती बारमाही आहे. पाणी जास्त लागणारी ऊस आणि भात ही पीकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. यंदा सप्टेंबरनंतर पावसाने ओढ दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातही २०१ गावांत दुष्काळ घोषित करण्यात आला. पण, दुष्काळाची तीव्रता असताना नगदी पीक असणाऱ्या उसाचे गाळप मात्र जोमाने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदाही उसाचे गाळप नेहमीप्रमाणे होताना दिसत आहे. गेल्या हंगामात १६ सहकारी साखर कारखान्यांमध्ये ९७.५३ लाख टन उसाचे गाळप होऊन १२२.५९  लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. तर, ७ खासगी कारखान्यांनी ३६.३४ लाख टन गाळप करून ४३.०४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. चालू हंगामाचा आता शेवटचा टप्पा जवळ आला आहे. काही कारखाने मार्चच्या मध्यापर्यंत गाळप करतील, अशी चिन्हे आहेत.

साखर सहसंचालक कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २० फेब्रुवारीपर्यंत १२२.६५ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून १३८.६० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळप सुरळीत झाले असले तरी काही ठिकाणी उताऱ्यामध्ये घसरण झाल्याचे मत व्यक्त होत आहे. अर्थात त्याविषयीही मतभेद आहेत. काही कारखान्यांच्या व्यवस्थापनाने उताऱ्यात फारसा फरक  नसल्याचे सांगितले. त्याचवेळी राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरची उताऱ्याची आघाडी कायम आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळ?

कोल्हापूर जिल्ह्यात २०१ गावांमध्ये नियमानुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात दुष्काळाची म्हणावी तशी झळ लागल्याचे जाणवत नाही. दुष्काळ जाहीर करण्याच्या पद्धती, निकष याला कारणीभूत असल्याने हा दुष्काळ तांत्रिक असल्याचे मानले जाते. जिल्ह्यात ७६ मंडळांपैकी १६ मंडळात कमी पाऊस पडला आहे. सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला असल्यास तो भाग दुष्काळी म्हटला जातो. जिल्ह्यातील २१० गावे या निकषात बसली. जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुके अतिवृष्टीचे आहेत. तर पूर्वेकडील तालुक्यांमध्ये कमी म्हणजे वार्षिक सरासरी पाऊस असतो. जिल्ह्याची एकूण पावसाची सरासरी उत्तम आहे. जिल्ह्य़ात सिंचनाची व्यवस्था चांगल्या प्रकारची असल्याने आताही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे दुष्काळाच्या सरधोपट नियमात कोल्हापूर जिल्हा बद्ध झाला असला तरी दुष्काळाच्या भीषणतेची स्थिती येथे जाणवत नाही.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here