यंदा ऊस उत्पादकांची गेल्या चार वर्षातील सर्वात कमी थकबाकी

नवी दिल्ली : ग्राहक व्यवहार, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या हंगामाच्या अखेरीस साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना ऊस बिलाची थकबाकी ६,६६७ कोटी रुपये शिल्लक आहे. गेल्या चार वर्षात ही सर्वात कमी थकबाकी असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तात म्हटले आहे.

२०२०-२१ या हंगामात साखर कारखान्यांद्वारे ९१,६८५ कोटी रुपयांच्या उसाची खरेदी करण्यात आली. त्यापोटी शेतकऱ्यांना बहुतांश पैसे मिळाले आहेत. आता फक्त ७ टक्के म्हणजेच ६,६६७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. २०१९-२० या हंगामाच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या थकबाकीचा आकडा १०,३४२ कोटी रुपये म्हणजेच १३.६२ टक्के होता. भारतात साखर हंगामाची सुरुवात १ ऑक्टोबरपासून होते. तर हंगाम समाप्ती पुढील वर्षीच्या ३० सप्टेंबरला केली जाते.

खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे संयुक्त सचिव सुबोध कुमार सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, साखरेची जादा निर्यात आणि इथेनॉल उत्पादनासाठी अधिक प्रमाणात साखरेचा वापर या दोन कारणांमुळे ऊस बिलांची थकबाकी कमी होण्यास मदत मिळाली आहे. गेल्या तीन वर्षात साखर निर्यात खूप वाढली आहे. आगामी २०२०-२१ या हंगामात साखर निर्यात ७० लाख मेट्रीक टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याशिवाय इथेनॉल बनविण्यासाठी साखरेचा वापर २०२०-२१ या हंगामात ९.३ लाख मेट्रीक टनावरुन वाढून २२ लाख मेट्रीक टनापर्यंत पोहोचला. आगामी वर्षात हा आकडा ३५ लाख मेट्रीक टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

खाद्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार साखर कारखान्यांनी २०२०-२१ या हंगामात उत्तर प्रदेशमध्ये ३३,०२३ कोटी रुपयांच्या उसाची खरेदी केली. हंगामाच्या अखेरीस त्यापैकी ५,०५३ कोटी रुपये अद्याप शेतकऱ्यांना दिलेले नाहीत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here