साखर कारखाना बंद करण्याच्या घोषणेने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत

संगरूर : भगवानपुरा साखर कारखाना (धुरी) च्या अधिकाऱ्यांनी कारखाना बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जवळपास ३५० गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जिल्ह्यातील कृषी विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी साखर कारखाना ताब्यात घेतला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारखान्याचे उप महाव्यवस्थापक अरुण शर्मा यांनी सांगितले की, आम्ही कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आम्हाला पुरेसा होईल एवढा ऊस उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. गळीत हंगाम कमीत कमी १५० दिवसांपर्यंत चालला पाहिजे. मात्र, गेल्या दोन वर्षात केवळ ५० दिवसच गाळप होऊ शकले आहे. ते म्हणाले की, आम्हाला ४५ लाख क्विंटल ऊसाची गरज भासते. मात्र, केवळ ३ लाख क्विंटल ऊस मिळत आहे. याशिवाय, शेतकऱ्यांकडून वारंवार सुरू असलेली आंदोलने हे कारखाना बंद होण्याचे आणखी एक कारण आहे.

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष हरजीत सिंह बुगरा यांनी सांगितले की, कारखाना बंद झाल्यास हजारो शेतकरी कुटूंबांसमोर एक गंभीर समस्या निर्माण होईल. हे शेतकरी कारखान्यावर अवलंबून आहेत. अनावश्यक विरोधी आंदोलने केल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की, दरवर्षी ऊस बिले देण्यास होणाऱ्या उशीरामुळे आम्हाला नाईलाजाने आंदोलने करावी लागली आहेत. आमचे जवळपास २०.७९ कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. कारण, जर कारखाना बंद पडला तर ३५० गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. सरकारने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळावीत यासाठी एक कार्यपद्धती तयार केली पाहिजे.

धुरीचे उप जिल्हाधिकारी अमित गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही कारखाना सुरू राहावा यासाठी कारखान्याचे अधिकारी आणि शेतकरी यांदरम्यान बैठक आयोजित करण्याची तयारी करीत आहोत. आम्ही कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कारखाना सुरू ठेवण्याविषयी समजावण्यासह शेतकऱ्यांची ऊस बिले व इतर मुद्दे निकाली काढण्याचा प्रयत्न करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here