आरबीआयची आजपासून पतधोरण आढावा बैठक, रेपो दर चौथ्यांदा वाढण्याची शक्यता

भारतीय रिझर्व्ह बँकची (आरबीआय) तीन दिवसीय पत धोरण आढावा बैठक आजपासून सुरू होत आहे. केंद्रीय बँक ३० सप्टेंबर रोजी रेपो दरात ०.५० टक्के वाढ करू शकते, अशी शक्यता आहे. जर असे घडले तर रेपो दर ५.९० टक्क्यांवर जाईल. सध्या हा दर ५.४० टक्के आहे. गेल्या आठवड्यात जगभरातील जवळपास डझनभर केंद्रीय बँकांनी व्याज दरात वाढ केली आहे. अमेरिकेतील बँकेने ०.७५ टक्के व्याज दरवाढ केली आहे.

अमर उजालामधील वृत्तानुसार महागाईला आळा घालण्यासाठी केंद्रीय बँका व्याज दरवाढीचे धोरण स्वीकारत आहेत. तरीही महागाईचा दर उद्दिष्टापासून दूरच आहे. भारतात किरकोळ महागाईचा दर सात टक्के आहे. तर आरबीआयचे उद्दिष्ट २ ते ६ टक्के इतके आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत तीन वेळा व्याज दरात १.४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परकीय चलन बाजारातील अलिकडील स्थिती पाहता आरबीआय ०.५० टक्के रेपो दरवाढ करू शकेल असे बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांनी म्हटले आहे. तर एसबीआयच्या म्हणण्यानुसार रेपो दरात ०.५० टक्के वाढ निश्चित आहे. याचा सर्वोच्च दर ६.२५ टक्क्यांपर्यंत जावू शकतो. अंतिम वाढ डिसेंबरमध्ये ०.३५ टक्के होईल. रेपो दरवाढीनंतर कर्जांचे हप्ते महागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here