बुलंदशहर : जहांगीराबाद साखर कारखान्याशी संलग्न तीन शेतकऱ्यांनी उसाचे सर्वाधिक उत्पादन घेवून उत्तर प्रदेशमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. या पीक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ ऊस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
राज्य ऊस स्पर्धा समितीची बैठक ऊस व साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. ज्यामध्ये राज्य ऊस स्पर्धा २०२२-२३ चे विविध संवर्गांचे निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती जहांगीराबाद साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस अधिकारी ज्ञानप्रकाश तिवारी यांनी सांगितले. ते म्हणाले की, अनुपशहर ऊस विकास परिषदेच्या तीन शेतकऱ्यांनी अथक परिश्रम करून नवीन वाण व नवीन तंत्रज्ञानातून चांगले उत्पन्न मिळवले. त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
शाहजहांपूरचे रहिवासी कमलकांत जय शर्मा यांनी ठिबक सिंचन पद्धतीने प्रती हेक्टरी १७५४ क्विंटल एवढे सर्वाधिक उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. बाधपुरा गावातील युवा शेतकरी मोहित अशोक कुमार याने रोपलावण प्रकारात प्रती हेक्टर १९४९ क्विंटल असे उत्पादन घेवून सर्वोच्च स्थान मिळवले. तर चरोरा ऊस विकास परिषदेच्या अंतर्गत रामप्रसाद योगेंद्र सिंह यांनी प्रती हेक्टर १९७० क्विंटल उत्पादन घेवून राज्यात द्वितीय स्थान पटकावले. विजेत्या शेतकऱ्यांना पाच हजार, दहा हजार आणि साडेसात हजारांचे बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.