कोल्हापूरातील साखर कारखान्यांनी राष्ट्रीय स्तरावर मारली बाजी

कोल्हापूर : चीनीमंडी

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे. यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वंसतदादा पाटील यांच्या नावे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा पुरस्कार कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. सर्वाधिक ऊस गाळप कॅटेगरीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातीलच हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली आहे. तर, सर्वाधिक साखर उताऱ्यात कागल तालुक्यातील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने बाजी मारली आहे. ऊस विकास गटामध्ये शिरोळच्या श्री दत्त सहकारी साखर कारखान्याने पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये या पुरस्कारांचे वितरण होणार असून, कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान तसेच याच खात्याचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ही माहिती दिली आहे.

साखर कारखाना महासंघाकडून १९८५ पासून दर वर्षी वेगवेगळे पुरस्कार देऊन कारखान्यांना प्रोत्साहन दिले जाते. सध्या महासंघात २६२ सहकारी साखर कारखाने तसेच ९ राज्यांच्या सहकारी साखर संघांचा समावेश आहे. यंदा पुरस्कारांच्या स्पर्धेत देशातील एकूण ९९ साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला होता. महासंघाकडून ऊस विकास, तांत्रिक क्षमता, आर्थिक व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कारखान्यांची निष्पक्ष तपासणी केली जाते. तज्ज्ञांनी दिलेल्या गुणांद्वारे पारितोषिके जाहीर केली जातात.

कोल्हापुरातील कारखान्यांसह सांगली जिल्ह्यातील हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याला ऊस विकास गटात दुसरा क्रमांक मिळाला आहे. तांत्रिक कार्यक्षमता गटात पुण्यातील जुन्नरच्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर याच गटात दुसऱ्या क्रमांकावर सोलापूरच्या श्रीपूरच्या श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने बाजी मारली आहे. आर्थिक व्यवस्थापनात लातूरचा विलास सहकारी साखर कारखाना पहिल्या तर, नगर जिल्ह्यातील संगमनेरचा भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सर्वाधिक निर्यात गटात, इंदापूरचा कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्राने सर्वाधिक दहा पुरस्कार पटकावले असून, त्या खालोखाल उत्तर प्रदेशच्या हाती चार पुरस्कार आले आहेत. तामीळनाडू, गुजरात आणि हरियाणातील सहकारी साखर कारखान्यांना दोन दोन पुरस्कार मिळाले आहेत. तर मध्य प्रदेशातील एका साखर कारखान्यालाही यात एक पुरस्कार मिळाला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here