नवी दिल्ली : भारतात लवकरच दुचाकी आणि चारचाकी वाहने केवळ इथेनॉल आधारित इंधन अथवा फ्लेक्स फ्यूएलवर आधारित वाहने चालू शकतील. कार्बन उत्सर्जनापासून दूर होण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचाही एक चांगला पर्याय ग्राहकासमोर असेल.
रविवारी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी म्हणाले की, देशात लवकरच इथेनॉल आधारित वाहने सादर केली जातील. याची सुरुवात टोयोटा कॅमरीपासून होईल. ही गाडी ऑगस्ट महिन्यात लाँच केली जाईल. गडकरी यांनी पुन्हा एकदा अशा वाहनांच्या आवश्यकतांवर भर दिला. प्रदूषण कमी करणे आणि पेट्रोल, डिझेलसारख्या महागड्या जीवाश्म इंधनावरील देशाचे अवलंबित्व यातून कमी होईल. यासाठी इलेक्ट्रिक वाहनांसह वैकल्पिक इंधनावर वाहने चालतील.
भारतात टोयोटा मोटर्सने पूर्णपणे इथेनॉलवर आधारित फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या कार्सचे परीक्षण सुरू केले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पेट्रोलला पर्यायाच्या स्वरुपात हरित इंधनावर अधिक विश्वास ठेवतात. ते म्हणाले की, इथेनॉल आधारित इंधनाकडे वळणे हे पर्यावरणासाठी फायदेशीर असेल. त्यातून ग्राहकांचा खर्चही कमी होईल. गडकरी म्हणाले की, आम्ही जी नवी वाहने आणत आहोत, ती पूर्णपणे इथेनॉलवर चालतील. बजाज, टीव्हीएस, हिरो स्कूटर १०० टक्के इथेनॉलवर धावतील.
ऑगस्ट महिन्यात टोयाटो कॅमरी लाँच केली जाईल अशी घोषणा गडकरी यांनी केली. ते म्हणाले, की भारतातील ही कार पूर्णपणे इथेनॉलवर चालण्यास सक्षम असेल. भारताने २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
इथेनॉल मुळ इथिल अल्कोहोल आहे, जे गूळ, धान्य आणि कृषी अवशेषांपासून तयार केले जाते. आयसीआरएच्या एका अभ्यासानुसार, भारताने वाहन प्रदूषण घटविण्यासाठी इथेनॉल मिश्रित वाहने आणि इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला आहे.