कोल्हापूर जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या चक्का जामने वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर : गतवर्षी गाळप झालेल्या उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता आणि यावर्षी ३ हजार ५०० रुपये एफआरपी द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. रविवारी या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केले. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावरील वाहतूक कित्येक तास ठप्प झाली होती.

आंदोलनामुळे जिल्ह्यात बहुतांशी साखर कारखान्यांच्या ऊस तोडी बंद आहेत. कारखान्यांचे गाळप पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला प्रतिसाद देत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. शिरोळ तालुक्यात उदगाव येथे शेतकऱ्यांनी कोल्हापूर-सांगली मार्ग रोखून धरला.

हेरवाड येथेही सलगर-सदलगा राज्यमार्ग दोन तास रोखून धरला. हातकणंगले तालुक्यात कबनूर येथे चक्का जाम झाला. यामुळे कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. हातकणंगलेत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कारखानदारांनी आता एकजूट केली आहे आणि सरकारही त्यांनाच बळ देत असल्याचा आरोप यावेळी शेट्टी यांनी केला. हुपरीत जुन्या बसस्थानकासमोर आंदोलन झाले. संघटनेने इचलकरंजीत पंचगंगा नदी पुलाजवळ वाहतूक रोखून धरली. नृसिंहवाडी शिरोळ मार्गावरही आंदोलन झाले.

करवीर तालुक्यात बीडशेड, सांगरुळ फाटा, कोपार्डे येथे आंदोलन झाले. परिते येथे झालेल्या आंदोलनाने कोल्हापूर-राधानगरीमार्गे कोकणात जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. पन्हाळा तालुक्यातही ठिकठिकाणी आंदोलन झाले. कोतोली फाटा येथे शेतकऱ्यांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग रोखून धरला. कोडोली-बोरपाडळे या मार्गावरही शेतकऱ्यांनी चक्का जाम केला. कळे येथे चक्का जाम करत परिसरातील शेतकऱ्यांनी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. यामुळे कोकणात जाणाऱ्या व कोकणातून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शाहूवाडी तालुक्यात बांबवडे आणि मलकापूर येथे चक्का जाम झाले. कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर तीन ठिकाणी आंदोलन झाल्याने या मार्गावरील वाहतूक दुपारनंतर पूर्ववत झाली. कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम करण्यात आला. बिद्री येथे शेतकऱ्यांनी ठिय्या मांडल्याने कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मुदाळतिट्टा येथेही आंदोलन झाल्याने कोल्हापूर-गारगोटी, राधानगरी निपाणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. केनवडे फाटा येथेही आंदोलन झाले. माद्याळ येथे ऊस तोड बंद पाडण्यात आली. लिंगनूर-कापशी येथे चक्का जाम करत निपाणी- फोंडा राज्य महामार्ग रोखून धरण्यात आला. राधानगरी तालुक्यात सरवडे येथे चक्का जाम केला. व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवत शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.

गडहिंग्लज तालुक्यात मुत्नाळ व बेळगुंदी येथे संकेश्वर-बांदा महामार्ग तसेच भडगाव येथे चक्का जाम करत गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्ग रोखून धरण्यात आला. चंदगड तालुक्यात फाटणे फाटा, अडकूर व कोवाड येथे चक्का जाम आंदोलन झाले. आजऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी चौक असा मोर्चा काढत शेतकऱ्यांनी चक्का जाम केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here