दोन साखर कारखान्यांच्या गोदामांना टाळे

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

कोल्हापूर : चीनी मंडी

थकीत एफआरपीप्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन कारखान्यांच्या गोदामांना टाळे ठोकण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील चिखली येथील विश्‍वास सहकारी साखर कारखाना आणि कोकरूड येथील दालमिया शुगर्स (निनाईदेवी) या कारखान्यांना टाळे लावण्यात आले आहे. त्याचबरोबर कडेगाव येथील केन अ‍ॅग्रो कारखाना आणि दत्त इंडिया (वसंतदादा) आणि महांकाली कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दत्त इंडियाचाची ६२ कोटी ५ लाख, केन अ‍ॅग्रो ३३ कोटी ५३ लाख, निनाईदेवीची २१ कोटी २२ लाख , महाकाली १५ कोटी ८४ लाख आणि विश्‍वास कारखान्याची ५७ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी आहे. ही रक्कम महसूली रक्कम म्हणून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची दखल घेऊन   शिराळा तहसीलदार शीतलकुमार यादव यांनी अधिकार्‍यांच्या फौजफाट्यासह विश्‍वास कारखान्याच्या साखर गोदामांना टाळे ठोकले. त्याशिवाय दालमिया कारखान्याचे साखर गोदाम देखील बंद करण्यात आले.

दत्त इंडिया कारखान्यास नोटीस दिली आहे. त्यांनी सोमवारपर्यंत एफआरपीची रक्कम न दिल्यास  सोमवारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मिरजेचे तहसिलदार शरद पाटील यांनी सांगितले. दरम्यान, कवठेमहांकाळ येथील महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या थकीत एफआरपीसाठी आरआरसी अतंर्गत कारवाई करण्याची नोटीस तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी बजावली. दरम्यान, नोब्हेंबर अखेरपर्यंत गाळप केलेल्या उसाची रक्कम देण्यात आली आहे, उर्वरित रक्कम देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारखान्याच्या वतीने सांगण्यात आले.

गळीत हंगाम सुरू होऊन तीन महिने झाले तरी अद्याप काही कारखान्यांनी एफआरपीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केलेले नाही. साखर नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कारखान्याला ऊस दिल्यानंतर १४ दिवसांत बिल देणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम दिलेली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीसाठी आंदोलन पुकारले आहे. सांगली जिल्ह्यातही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यांवर कारवाई झाली नाही तर, बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला होता.

संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन साखर आयुक्तांनी एफआरपी थकविलेल्या कारखान्यांच्या विरोधात नोटिस दिली आहे. कारखान्यांकडील साखरेसह मळी, बगॅस आणि इतर उत्पादने जप्त करुन, नंतर त्यांची विक्री करुन शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कम देणे अपेक्षित आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here